अकोला,दि.18 : विदर्भातील काही भागात सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद पिकावर मिलीपेड्स अर्थात पैसा किंवा वाणी या किडीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येतो. या किडीच्या नियंत्रणाबाबत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातर्फे सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत.
पैसा किंवा वाणी ही एक निशाचर कीड असून सामान्यत: सडणारी पाने, तसेच काडीकचरा, कुजणाऱ्या वनस्पती आदी पदार्थांना खाऊन उपजिवीका करते. साधारणपणे निसर्गातील कुजलेला काडीकचरा विघटनाचे कार्य त्यातून होते. तथापि, या किड्याची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढते तेव्हा ते जमिनीवर संपर्कात येणाऱ्या रोपटे, बियाणे यांना खाऊन नुकसान करतात, तसेच रोपे कुरतडून टाकतात. त्यामुळे रोपांची संख्या कमी होऊन दुबार पेरणीची वेळ येऊ शकते.
अंडी , अळी, व प्रौढ अशा या किडीच्या वाढीच्या अवस्था असतात. एक मादी साधारणपणे 300 अंडी घालते. प्रौढ अवस्था प्रदीर्घ व संपूर्ण जीवनक्रम पाच ते सात वर्षांचा असतो. त्याच्या वाढीसाठी भूमीतील आर्द्रता आवश्यक असते. त्यामुळे पावसाळ्यात किंवा ओलितात ही कीड जास्त सक्रिय असते. हवामान अनुकूल नसेल तर ती जमिनीत सुप्त अवस्थेत राहते.
उपाययोजना काय कराल
मिलीपिड्सच्या नियंत्रणासाठी पुढील उपाययोजना कराव्यात. शेतातील पालापाचोळा किवा वाळलेला कुजलेला काडी कचरा गोळा करुन नष्ट करावा. वाणी रात्री जास्त सक्रिय असल्याने रात्रीच्या वेळी शेतात गवताचे ढीग करुन ठेवावेत आणि सकाळी गवताच्या ढिगाखाली जमा झालेले वाणी मिठाच्या व साबणाच्या द्रावणात टाकावेत. शेतातील आर्द्रता आणि लपण्याची ठिकाणे कमी करुन बांधावरील गवत, दगड काढुन बांध मोकळा ठेवावा. बऱ्याचदा आर्द्र, घनदाट पीकात जास्त पाणी दिल्याने किंवा संध्याकाळी पाणी चालू ठेवल्यास प्रादुर्भाव वाढतो. जास्त आर्द्रता व अन्नाचा पुरवठा नसल्यास काही दिवसातच वाणी मरतात. पेरणीपुर्वी बीजावर प्रक्रिया केली असेल तर प्रादुर्भाव कमी असतो.
पिकामध्ये वेळेवर कोळपणी करावी त्यामुळे जमिनीतील अंडी व लपुन बसलेल्या वाणी किडी उघड्या पडून नष्ट होतील. चांगला पाऊस पडल्यास या किडींचे नैसर्गिक नियंत्रण होते.
पेरणीपूर्वी रासायनिक नियंत्रण
ज्या शेतामध्ये वारंवार या किडींचा प्रादुर्भाव होत असेल तेथे पेरणीपुर्वी कार्बोराल्फान (6 टक्के दाणेदार) किंवा क्लोरपायरीफॉस (10 टक्के दाणेदार) किवा फिप्रोनिल(0.3 टक्के) 5 किलो प्रति 100 किलो शेणखतात मिसळुन 1 हेक्टर शेतात पसरवावे. ही कीटकनाशके प्रयोगांत परिणामकारक असल्याचे आढळुन आले आहे.
पेरणीनंतर उपाययोजना
पेरणी झाल्यावर रोप उगवल्यानंतर या किडीचा प्रादुर्भाव आढळुन आल्यास क्लोरपायरीफॉस 20 ईसी 37.5 मिली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळुन पंपाचे नोझेल ढिले करुन रोपांभोवती वर्तुळाकार किंवा सरळ ओळीत ड्रेंचिंग करावे. एक एकर क्षेत्रात 40 पंपाचे ड्रेंचिंग करावे किंवा क्लोरपायरीफॉस 50 टक्के + सायपरमेथ्रीन (5 टक्के एसपी) 15 मिली प्रतिलीटर या उपाययोजना शक्यतोवर सायंकाळी कराव्यात. या किडनाशकाची शिफारस मिलीपीड (वाणी) साठी नाही, मात्र कापूस पिकामध्ये आहे, असे डॉ. उंदीरवाडे यांनी नमूद केले आहे.