राज्यातील बहुतांश भागात १ ते ६ जुलै दरम्यान समाधानकारक पाऊस झाला आहे. दरम्यान, पुढील २४ तासांत कोकण, विदर्भाचा पूर्व भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. मुंबईत मध्यम स्वरुपाचा पाऊस राहील. तसेच पुढील ४ ते ५ दिवसांत कोकणात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
पुढील २ ते ३ दिवसांत घाट क्षेत्रातही मध्यम पावसाची शक्यता आहे. गेल्या २४ तासांत मुंबई, ठाण्यात मध्यम ते जोरदार पावसाची नोंद झाली आहे. पुणे जिल्ह्यातील लवासा येथे गेल्या २४ तासांत सर्वाधिक ९९ मिलिमीटर पाऊस झाला आहे. लोणावळा येथे ९३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. सातारा जिल्ह्यातील पाटण येथे ३८ मिमी पाऊस झाला आहे. रायगडमधील पेण येथे १२६ मिमी, कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा येथे ९० मिमी, सिंधुदुर्गमधील दोडामार्ग येथे १०७ मिमी, रत्नागिरीतील खेड येथे १०२ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
दरम्यान, रत्नागिरीसह रायगड आणि पालघर जिल्ह्यात ‘ऑरेंज अलर्ट’ कायम करण्यात आला आहे तर ठाणे, आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
मोसमी पावसाचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे सरकला असल्याने आणि पश्चिम किनार्याला समांतर कमी दाबाचा पट्टा दक्षिण गुजरातपासून केरळ किनारपट्टीपर्यंत सक्रीय असल्याने कोकण किनारपट्टी भागात पावसाचा जोर वाढल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.