पुणे : राज्यात कोकणात तीन जुलै, तर मध्य महाराष्ट्रात एक जुलैपर्यंत पावसाचा जोर राहणार आहे. मात्र, विदर्भ व मराठवाड्यात पाऊस ओसरला आहे. तेथे रिमझिम पाऊस राहील. दरम्यान, मान्सूनने गुरुवारी राजस्थान व पंजाबात प्रगती केली. राज्याच्या बहुतांश भागातील पाऊस ओसरत असून, विदर्भ व मराठवाड्यातील मोठा पाऊस कमी झाला आहे. तेथे जुलैच्या पहिल्या आठवड्यात रिमझिम पाऊस राहणार आहे. कोकणात पावसाचा जोर सर्वाधिक असून, 30 जून ते 3 जुलैपर्यंत तेथे मुसळधार पावसाचा अंदाज दिला आहे. मध्य महाराष्ट्रात अजून 48 तास (30 जून व 1 जुलैपर्यंत) पावसाचा जोर राहील, असे हवामानशास्त्र विभागाने गुरुवारी सांगितले. मान्सूनने गुरुवारी राजस्थानसह पंजाब व हरियाणाच्या काही भागांत प्रगती केली असून, त्या भागात जोरदार पाऊस सुरू आहे.
मात्र, अजून त्याने शंभर टक्के देश काबीज केलेला नाही. 29 जूनपर्यंत 98 टक्के भाग व्यापला आहे. मात्र, दोन टक्के भाग अजून व्यापायचा आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात भागात कमी दाबाचे पट्टे तयार झाले आहे. त्यामुळे त्या भागात पाऊस वाढण्याची शक्यता आहे. तर महाराष्ट्र-केरळ किनारपट्टीवर ढगांची गर्दी कायम असल्याने कोकणात तीन जुलैपर्यंत पाऊस वाढला आहे.
राज्यातला 24 तासांतील पाऊस (मि.मी.मध्ये)
कोकण विभाग : पालघर 255, वाडा 195, श्रीवर्धन 187, डहाणू 183, भिवंडी 180, उल्हासनगर 166, अंबरनाथ 157, कुलाबा 148, वसई 146, विक्रमगड 145, मुरूड 140, उरण, तळा 138, शहापूर 137, गुहागर 131, देवगड 124, पाली 119, कल्याण 115, माणगाव 107, दापोली 103, मुरबाड, मंडणगड 103, कणकवली, हर्णे 96, माथेरान 94, पनवेल 89, महाड 86, चिपळूण 84, पोलादपूर 82, मालवण 81, कर्जत 79, तलासरी, लांजा 79, कुडाळ 77, ठाणे 77. मध्य महाराष्ट्र : इगतपुरी 164, महाबळेश्वर 107, नवापूर 68, अक्कलकुवा 64, गगनबावडा 56. मराठवाडा : पाथरी 28, वैजापूर 23, माजलगाव 23, जिंतूर, मानवत 19, गंगापूर, भूम 18, गंगाखेड 16, सेलू, पाटोदा 14. विदर्भ : भंडारा 10, सालेकसा 9, मोहाडी 8, भामरागड 7, गोरेगाव, मेहकर, कुही, तुमसर, साकोली 6. घाटमाथा : डुंगरवाडी 126, ताम्हिणी 122, अम्बोणे 104, भिरा 96, दावडी 85. मुंबईला पाणीपुरवठा करणारे तलाव : तुलसी 235, वैतरणा 144, मध्य वैतरणा 137, अप्पर वैतरणा 122, तानसा 109.
आगामी चार दिवस असा पडेल पाऊस
- कोकण विभाग : 30 जून ते 3 जुलै (ऑरेंज अलर्ट). (पालघर, रत्नागिरी, रायगड, मुंबईत जोर).
- कोल्हापूर, पुणे, नाशिक घाट : 1 जुलैपर्यंत (ऑरेंज अलर्ट).
- मध्य महाराष्ट्र : 1 जुलैपर्यंत मध्यम पाऊस.
- विदर्भ, मराठवाडा : 3 जुलैपर्यंत रिमझिम.