पुणे : एका व्यक्तीच्या रक्तदानामुळे दोन-तीन रुग्णांचे प्राण वाचतात. नियमितपणे रक्तदान केल्याने शरीरात नवीन रक्त तयार होण्याची प्रक्रिया सुरळीत सुरू राहते व रोगप्रतिकारशक्ती वाढते. त्यामुळे संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य आजारांची लागण होण्याचे प्रमाणही नगण्य राहते म्हणून निरोगी राहायचे असेल, तर रक्तदान करा, असे आवाहन शतकवीर रक्तदात्यांनी केले आहे. दरवर्षी 14 जून हा जागतिक रक्तदाता दिवस म्हणून साजरा केला जातो. यंदाची थीम ‘रक्त द्या, प्लाझ्मा द्या आणि नवसंजीवनी द्या’ असे आहे. गेल्या काही वर्षांमध्ये कॅन्सर, अवयव निकामी होणे, रक्ताशी संबंधित आजारांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे रुग्णांना रक्ताची मोठ्या प्रमाणात गरज भासत आहे. रक्तदानाचे प्रमाण वाढल्यास भविष्यातील रक्ताचा तुटवडा कमी करता येऊ शकतो. रक्ताचे नाते ट्रस्टचे संचालक राम बांगड 66 वर्षांचे असून, त्यांनी आजवर 136 वेळा रक्तदान, 15 वेळा प्लाझ्मा आणि 24 वेळा प्लेटलेट दान केले आहे. रक्ताचे नाते ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी 2001 पासून 1 हजारहून अधिक रक्तदान शिबिरे आयोजित केली आहेत. दर महिन्याला शंकर महाराज मठात रक्तदान शिबिराचे आयोजन करून 25 शिबिरांतून रक्ताच्या 7831 बॅगचे संकलन केले आहे.
ससून रुग्णालयाच्या समाजसेवा अधीक्षक कार्यालयाचे विभागप्रमुख डॉ. शंकर मुगावे 54 वर्षे वयाचे असून, त्यांनी आतापर्यंत 100 वेळा रक्तदान केले आहे. त्यांनी 1989 मध्ये पहिल्यांदा रक्तदान केले. रक्तदान या विषयामध्ये त्यांनी पीएचडी केली आहे. कोरोना महामारीच्या काळात ससून रुग्णालयात काम करूनही त्यांना एकदाही कोरोनाची लागण झाली नाही. नियमित रक्तदानामुळेच रोगप्रतिकारशक्ती वाढल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.