पुणे : अरबी समुद्राकडे बाष्पयुक्त वार्यांचा वेग वाढल्याने केरळमध्ये 1 जून, तर महाराष्ट्रात तळकोकणात 7 जून रोजी मान्सून येऊ शकतो, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. मंगळवारी (दि. 23) अरबी समुद्राकडे बाष्पयुक्त वार्यांचा प्रवास सुरू होताच मान्सूनचा महाराष्ट्राकडे येण्याचा वेग वाढला असून, केरळात 4 ऐवजी 1 जून रोजीच तो येऊ शकतो. तसेच महाराष्ट्रात तळकोकणात 7 जूनपर्यंत दाखल होण्यास वातावरण अनुकूल झाले आहे.
सध्या मान्सून बंगालच्या उपसागरात असून, तो वेगाने प्रगती करीत आहे. उत्तर भारतात पश्चिमी चक्रवात निर्माण झाल्याने त्या भागात पाऊस सुरू झाला आहे. तसेच महाराष्ट्र ते तामिळनाडू भागावर चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. अरबी समुद्रात बाष्पयुक्त वार्यांचा प्रभाव वाढल्याने हा बदल झाला आहे.
कोकणात 27 मेपासून पाऊस
कोकणात हलका ते मध्यम पावसाचा अंदाज देण्यात आला असून, 27 मेपासून तेथे मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. उकाड्यापासून सुटका होणार बाष्पयुक्त ढगांचा ओघ सुरू झाला असून, लवकरच उकाड्यापासून सुटका होण्याचे संकेत पुणे वेधशाळेने दिले आहेत. बुधवारी दुपारपासूनच पुणे शहरात गार वारे सुटले अन् सायंकाळी 7 वाजता पुणे वेधशाळेचे हवामान विभागप्रमुख अनुपम कश्यपी यांनी पुण्यावर बाष्पयुक्त ढग आल्याचे सॅटेलाईट छायाचित्र शेअर केले. त्यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या उकाड्यातून लवकरच पुणेकरांची सुटका होण्याचे संकेत आहेत.
तापमानात 3 अंशांनी झाली घट
मंगळवारी अरबी समुद्रात बाष्पयुक्त वारे दाखल झाले. त्याचा तत्काळ परिणाम दिसून आला असून, शहराचा पारा 40.3 अंशांवरून बुधवारी 37 अंशांपर्यंत खाली आला. बुधवारी सायंकाळी शहरात गार वारे सुटल्याने हवामान विभागाने हलका ते मध्यम पावसाचा अंदाज दिला आहे.