अकोला, दि.२४ : जिल्हा आपत्ती प्रतिसाद दलाच्या मान्सूनपूर्व प्रशिक्षणास आजपासून प्रारंभ झाला. नागपूर येथील राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या पथकाने हे प्रशिक्षण दिले. येते दोन दिवस जिल्ह्यात हे प्रशिक्षण सुरु राहणार आहे.
मान्सूनपुर्व तयारीसाठी जिल्हा आपत्ती प्रतिसाद दलाचे आज प्रशिक्षण घेण्यात आले. नियोजन भवनात हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे मुर्तिजापूर तहसिलदार शिल्पा बोबडे, नायब तहसिलदार विजय सुरळकर, सपना काळे , आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे संदीप साबळे हे यावेळी उपस्थित होते.
राज्य आपत्ती प्रतिसाद दल नागपूर येथील तज्ज्ञ अमोल गोखले, एन.डब्ल्यू. वाडकर, वाय.एन. काकडे, आर.ए. चवदळ, एम.पी. खांडके, रितेश सिंग यांच्या पथकाने जिल्ह्यातील दलाला प्रशिक्षण दिले.
जिल्ह्यातील आपत्ती प्रतिसाद दलातील पोलीस, होमगार्ड, तलाठी, मंडळ अधिकारी, अग्निशामक दलाचे जवान तसेच स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी अशा एकूण २०० जणांनी या प्रशिक्षणात सहभाग घेतला. या प्रशिक्षणात टाकाऊ वस्तूंपासून बचाव साहित्य तयार करणे, अडकलेल्या लोकांची सुटका करणे, त्यांना प्रथमोपचार करणे, पूर वा अन्य आपत्ती प्रसंगी करावयाची बचाव कार्ये याबाबत प्रत्यक्ष प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण देण्यात आले. आणखीन दोन दिवस हे प्रशिक्षण प्रत्यक्ष क्षेत्रावर जाऊन दिले जाणार आहे. त्यात उद्या म्हणजेच गुरुवार दि.२५ रोजी पोपटखेड येथे तर शुक्रवार दि.२६ रोजी महान येथे हे प्रशिक्षण दिले जाणार आहे, अशी माहिती संदीप साबळे यांनी दिली.