अकोला दि.27 :- पाण्याचे दुर्भिक्ष्य असणाऱ्या भागात संरक्षित सिंचन सुविधा अधिक आवश्यक असते. अशा भागात शेतकऱ्यांना सिंचन सुविधेसाठी पाणी साठवणूकीसाठी शेततळे बांधण्यासाठी एकात्मिक फलोत्पादन विकास योजनेअंतर्गत अनुदान दिले जाते. या योजनेचा लाभ घेत खेर्डा बु. येथील शेतकऱ्यांनी सामुहिक शेततळे साकारले आणि आपल्या फळपिकांना जीवदान देत उत्पादन घेतले.
शेतकऱ्यांचे सामुहिक शेततळे
खेर्डा येथे प्रीती अनिल ताकवाले या महिला शेतकरी आहेत, त्यांनी अन्य शेतकऱ्यांसह सामुहिक अर्ज करुन शेततळे प्रस्ताव सादर केला. त्यांच्या प्रस्तावाची छाननी होऊन त्यांना शेततळे मंजूर झाले. ५ हजार घनमिटर क्षमतेचे सामुहिक शेततळे त्यांनी साकारले असून त्यासाठी त्यांना ३ लाख ६ हजार १५१ रुपये इतके अनुदान प्राप्त झाले. तब्बल ३४ मी लांब, ३४ मी रुंद आणि ४.७० मी खोल असे हे शेततळे त्यांनी साकारले. त्याला प्लास्टीकचे आच्छादनही केले. त्यांच्या समवेत संदीप हरणे व अन्य शेतकरी सहभागी झाले.
ठिबक सिंचनाचा वापर
त्यानंतर या शेतकऱ्यांनी या संरक्षित सिंचनावर आपल्या चिकू, आंबा, लिंबू इ. फळबागा जगविल्या आहेत. सद्यस्थितीत या शेतकऱ्यांकडे मुबलक पाणी सिंचनासाठी उपलब्ध आहे. तरीही त्यांनी आपल्या फळबागा ह्या ठिबक सिंचनाचा वापर करुन सिंचनाखाली आणल्या आहेत.
आंतरपिकाचाही प्रयोग
साहजिक फळबागा, त्यात कांद्यासारखे आंतरपिकाचे प्रयोग करुन हे शेतकरी उत्पादन घेत आहेत. या शिवाय शेततळ्याच्या पाण्यात मत्स्योत्पादनाचा प्रयत्नही हे शेतकरी करीत आहेत. या शेतकऱ्यांना तालुका कृषी अधिकारी विलास वाशिमकर व त्यांच्या क्षेत्रिय सहकाऱ्यांनी सहकार्य व मार्गदर्शन केले आहे.
एकात्मिक फलोत्पादन विकास योजना
राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाचा भाग म्हणून ही योजना राबविली जाते. वैविध्यपूर्ण हवामान विभागानुसार प्रादेशिक अनुकूलता व गरजा लक्षात घेऊन त्या त्या भागात फलोत्पादनाला चालना दिली जाते. त्यात संशोधन, तंत्रज्ञान प्रसार, विस्तार, काढणीत्तोर तंत्रज्ञान, प्रक्रिया व पणन सुविधा देऊन समुह पद्धतीने विकास केला जातो. यात शेतकऱ्यांचे एकत्रिकरण करणे हा महत्त्वाचा घटक आहे. त्याद्वारे फलोत्पादनात वाढ करणे, उत्पन्नात वाढ करुन आहार विषयक सुरक्षा बळकट करण्यात येते. यात सुक्ष्म सिंचनाला चालना दिली जाते. जिल्हास्तरावर जिल्हास्तरीय समिती असून त्यासमितीमार्फत योजनेचा प्रसार व शेतकऱ्यांची निवड करणे आदी बाबी करण्यात येतात, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी विलास वाशिमकर यांनी दिली.