अकोला दि. 17 :- प्रधानमंत्री किसान सन्माननिधी योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना सन्माननिधी वितरीत केल्या जातो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांचे बँक खाते आधार क्रमांकास जोडणे आवश्यक आहे. यासाठी पोस्ट विभागाने पोस्टमनच्या माध्यमातून गावातच सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेचा ग्रामीण भागातील लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन नायब तहसीलदार एस.पी.ढवळे यांनी केले आहे.
प्रधानमंत्री किसान सन्माननिधी योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना तीन हफ्त्यात 2 हजार रुपये प्रमाणे वर्षाला 6 हजार रुपये मानधन देण्यात येतो. या योजनेचा तेरावा हफ्ता जमा करण्याची कार्यवाही सुरु झाली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांचे बँक खाते आधार क्रमांकास जोडणे बंधनकारक आहे. राज्यात सद्यास्थितीत 14 लाख 32 हजार लाभार्थ्यांचे बँक खाते आधार क्रमांकास संलग्न नाही. त्यात जिल्ह्यातील 23 हजार 669 लाभार्थ्यांचा समावेश आहे. त्यामुळे या लाभार्थ्यांना तेराव्या हफ्त्याचा लाभ जमा होणार नाही. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्ट विभागाव्दारे लाभार्थ्यांना त्यांचे बँक खाते इंडिया पोस्ट पेमेंट बँक उघडण्याची व ते आधार क्रमांकाशी जोडण्याची सुविधा त्यांच्या गावातील पोस्टमास्तरमार्फत उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी आपले आधार कार्ड व मोबाईल क्रमांक या कागदपत्रांच्या आधारे इंडीया पेमेंट बँकेत आपल्या गावातील पोस्ट विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या सहायाने बॅक खाते सुरु करण्यात येईल. बँक खाते आपल्या आधार क्रमांकाशी 48 तासात जोडल्या जाईल.
इंडिया पोस्ट पेमेंट बँक कार्यालयास गावनिहाय याद्या उपलब्ध करून देण्यात आल्या असून गावातील पोस्टमास्तर लाभार्थ्यांना संपर्क करून इंडिया पोस्ट पेमेंट बँकमध्ये खाती उघडून देतील. आधार कोणत्याही अतिरिक्त कागदपत्रांशिवाय करता येणार असल्याने अत्यंत सोपी आणि सुलभ आहे. इंडिया पोस्ट पेमेंट बँक मध्ये बँक खाते सुरु करण्याची सुविधा आपल्या गावातील पोस्ट कार्यालयातच उपलब्ध असल्याने लाभार्थींनी इतरत्र जाण्याची गरज पडणार नाही. तरी लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी या मोहिमेचा लाभ घ्याव्या, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.