अकोला,दि. 9 :- जिल्हा परिषदेला राष्ट्रीय दिव्यांगजन सशक्तिकरण पुरस्कार मिळाला असून या पुरस्कारामुळे अकोला जिल्ह्याचे नाव देशभर झाले आहे. पुरस्कारामुळे प्रशासनाची जबाबदारी वाढली असून दिव्यांगांच्या सेवेसाठी व त्यांना कल्याण योजनांचे लाभ देण्यासाठी प्रशासन तत्पर आहे,असे प्रतिपादन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी बुधवारी (दि.७) केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनाच्या छत्रपती सभागृहात राष्ट्रीय दिव्यांगजुन सशक्तिकरण पुरस्कार २०२१ प्राप्त झाल्याबद्दल जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार व दिव्यांग सर्व्हेक्षण उपक्रमात योगदान देणारे कर्मचारी, संस्था यांचा गौरव सोहळा बुधवारी सायंकाळी पार पडला. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी निमा अरोरा या होत्या. या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार,अप्पर जिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, जिल्हा परिषदेचे अति. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, उपजिल्हाधिकारी बाबासाहेब गाढवे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मुकेश चव्हाण,उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, समाजकल्याण अधिकारी ज्ञानोबा पुंड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले आदी यावेळी उपस्थित होते.
दिव्यांग सर्व्हेक्षण पार पाडतांना ज्या ज्या विभागांनी, शासकीय अधिकारी कर्मचारी तसेच दिव्यांग कल्याणाच्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयांनी सांगितले की, दिव्यांगांना कोणत्याही योजनेचा लाभ देण्यासाठी दिव्यांग ओळखपत्र देणे आवश्यक असते. त्यासाठी दिव्यांगांची नोंद शासन दप्तरी होणे आवश्यक असल्याने हे सर्व्हेक्षण करणे गरजेचे होते. सर्व्हेक्षण प्रक्रिया राबविणे, दिव्यांगांची वैद्यकीय तपासणी करुन दिव्यांगत्व निश्चिती करणे, दिव्यांग ओळखपत्र देणे या कामांसाठी तसेच सर्व्हेक्षण प्रक्रिया राबवितांना दिव्यांगांमध्ये जनजागृती करण्यासाठी दिव्यांगांसाठी कार्य करणाऱ्या संस्था, संघटनांची मोलाची मदत झाली. आशा ताईंनी प्रत्यक्ष घरोघरी सर्व्हेक्षण केले. त्यांच्या शिवाय हे सर्व्हेक्षण पूर्ण होऊ शकले नसते. प्रत्येक योजनेचा लाभ देतांना पात्र दिव्यांगांना प्राधान्य देण्यात येईल व दिव्यांगांच्या कल्याणाचे कार्य करण्यासाठी साऱ्यांनी मिळून काम करावयाचे आहे. असे त्यांनी आवाहन केले. संयोजन गजानन महल्ले , किशोर बळी यांनी सूत्र संचलन तर उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार यांनी आभार मानले.