अकोला, दि.4 : – गाढव म्हणजे बावळट, निर्बुद्ध आणि मुर्ख प्राणी एक सरसकट समज आहे. मात्र गाढव हा दळणवळण, प्रवास, ओझे वाहणे इ. कामांसह विविध उपयोगी अश्ववंशीय प्राणी आहे. अर्थार्जनासाठी गाढव पालन व्हावे त्यासाठी गाढव पालकांना शास्त्रीय पद्धतीने गाढवांचे पालनपोषणाबाबतचे प्रशिक्षण येथील स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था ही कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), अकोला यांच्या सहयोगातून देणार आहे. त्यासाठी प्रत्येक तालुक्यातून ३० गाढव पालकांना प्रशिक्षणासाठी निवडले जाणार आहे.
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, येथील स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, अकोला येथील संशोधक डॉ. प्रवीण बनकर हे गाढवांवरील संशोधन प्रकल्प राबवित आहेत. अकोला जिल्ह्यात सातत्याने गाढवांच्या संख्येत होणारी घट हा चिंतेचा विषय आहे. त्यात अकोला येथील वातावरणात टिकून राहणारे स्थानिक गाढवं ही कमी होतायेत. आजमितीला अकोला जिल्ह्यात फक्त ९०० गाढवे शिल्लक आहेत, असे डॉ. बनकर सांगतात. यासाठी त्यांनी सर्व्हेक्षण केले आहे.
गाढव या प्राण्याचा जे समुदाय वापर करीत होते त्यांच्या व्यवसायातही स्थित्यंतरे झाल्याने ही समस्या निर्माण झाली आहे. प्रामुख्याने गाढवे ही ग्रामिण व शहरी भागात वाळू वाहतूक, मडकी वाहून नेणे, दगडी वस्तू इ. वाहतुकीसाठी होत असे. मात्र हे व्यवसाय करणाऱ्या व्यक्तिंनीही यांत्रिकीकरणाचा वापर सुरु केल्याने गाढव पालन हा दुर्लक्षित विषय ठरला. डॉ. बनकर यांच्या अभ्यासानुसार देशात गाढवांची संख्या ६१ टक्के तर राज्यात ४० टक्क्यांनी घटली आहे. पशुधन अभ्यासक म्हणून गाढव पालकांना विशेष प्रशिक्षण देऊन गाढवांचा निवारा, आहार,पैदास व्यवस्थापन याबाबत शास्त्रीय माहिती दिल्यास गाढवांचे उत्तम संगोपन होईल. त्यांची पुढील पिढी अधिक सशक्त व धष्टपुष्ट होईल. त्यासोबतच गाढवांचे रोगनिदान, उपचार व्यवस्थापन या बाबींचाही प्रशिक्षणात समावेश असेल.
या प्रशिक्षणातून स्थानिक जातीच्या गाढवांचे संवर्धन करुन त्यांची नोंद राष्ट्रीय पशु अनुवांशिकी संशोधन केंद्राकडे केली जाईल. आता सध्या देशातील या शिखर संस्थेकडे कच्छि, सिरी, हलारी या गाढवांची नोंद आहे. त्यात महाराष्ट्राच्या दख्खन पठारावर आढळणारी स्थानिक जातीच्या गाढवांची नोंद करण्यासाठीही प्रयत्न होणार आहेत. गाढवांचा आर्थिक उत्पादनाच्या दृष्टीने वापर कसा होऊ शकतो याबाबतही संशोधन आहे. त्यात गाढविणीच्या दुधाची सौदर्यप्रसाधन उद्योगातील उपयुक्तता, गाढवाच्या विष्ठेची उपयुक्तता, त्यांची रोगप्रतिकारकता इ. बाबींवर संशोधन होणार आहे.
मुळात गाढवे ही अत्यंत हुशार व नम्र असतात. अन्य प्राणी जसे गाय, बैल, शेळी इ. प्रमाणे पशुपालक त्यांचे आहार व अन्य व्यवस्थापनावर जो खर्च करावा लागतो तो गाढव पालक करत नाहीत. त्यामुळे त्यांची चांगली सशक्त पैदास होण्याच्या दृष्टीने व गाढव पालकांना आर्थिक फायदा होण्याच्या दृष्टीने स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, अकोला व आत्मा यांचे वतीने गाढवपालकांसाठी तीन दिवसीय कौशल्य विकास प्रशिक्षणाचे आयोजन वर्ष २०२२-२०२३ दरम्यान करण्यात येणार आहे. याकरिता अकोला, अकोट, तेल्हारा, बाळापूर आणि बार्शीटाकळी तालुक्यातील इच्छुक गाढव पशुपालकांनी डॉ प्रवीण बनकर (९९६०९८६४२९) यांचेकडे दि.३० नोव्हेंबर २०२२ पूर्वी नोंदणी करावी असे आवाहन संस्थेचे सहयोगी अधिष्ठाता प्रा. डॉ. धनंजय दिघे यांनी केले आहे. गाढवांचे शास्त्रोक्त पद्धतीने संगोपन व प्रथमोपचार संबंधी सदर प्रशिक्षणासाठी प्रत्येक तालुक्यातून निवडक प्रत्येकी ३० गाढव पशुपालकांची निवड करण्यात येईल,असेही कळविण्यात आले आहे.