राज्याच्या पोलिस दलातील पोलिस शिपाई संवर्गातील 2021 पर्यंतच्या सर्व रिक्त 11 हजार 443 पदांची भरती करण्यास गृह विभागाने मंजुरी दिली आहे. यामुळे जिल्हानिहाय रिक्त जागांची भरती प्रक्रिया सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याचबरोबर महसूल, ग्रामविकास, आरोग्य आदी अन्य सर्व विभागांतील रिक्त जागांच्या 50 टक्के जागा भरण्यास वित्त विभागाने मंजुरी दिल्याने त्याचीही भरती प्रक्रिया लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. राज्यातील पोलिस दलात 2021 पर्यंत 11 हजार 443 जागा रिक्त आहेत. या जागांची भरती करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. मात्र, वित्त विभागाने 12 एप्रिल 2022 रोजी दिेल्या आदेशानुसार प्रत्येक विभागाच्या सुधारित आकृतिबंधानुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील पदे वगळता अन्य पदे
50 टक्केच भरण्यास मंजुरी देण्यात आली होती.
राज्यात सध्या कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न विचारात घेता पोलिस दलातील सर्व रिक्त पदे भरण्यासाठी वित्त विभागाच्या 12 एप्रिलच्या आदेशातून सूट देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला होता. त्यानुसार पोलिस दलातील सर्व रिक्त पदे भरण्यास गृह विभागाने मान्यता दिली आहे. या आदेशामुळे राज्यातील रिक्त पदांची भरती प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. दिवसेंदिवस कामाचा ताण वाढत आहे. भरती प्रक्रिया होत नसल्याने त्यात दरवर्षी भरच पडत आहे. यामुळे सर्व रिक्त पदांची भरती करण्याची मागणी कर्मचारी संघटनांकडून सातत्याने होत आहे.
अन्य विभागांत रिक्त पदांच्या 50 टक्के भरती
अन्य सर्व विभागांतील राज्य लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त असलेली सर्व पदे भरण्यास वित्त विभागाने मान्यता दिली आहे. मात्र जी पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेत येत नाहीत, त्या सर्व अन्य संवर्गातील सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त पदांच्या 50 टक्के भरती करण्यास वित्त विभागाने मंजुरी दिली आहे. ज्या विभागांत एकच पद रिक्त असेल तर ते पद भरता येणार आहे.