अकोला दि.13 : संयुक्त कुष्ठरोग शोध अभियान आणि सक्रिय क्षय रुग्ण शोध आजपासून (दि.13) राबविण्यात येणार आहे. या मोहिमे दरम्यान आशा स्वयंसेविक, आरोग्य कर्मचारी व स्वयंसेवक घरोघरी भेट देणार असून त्यांना सहकार्य करावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांनी केले.
राष्ट्रिय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांर्तगत क्षयरुग्ण शोधण्याचे वार्षिक उदिष्ट शासकिय क्षेत्राकरीता 1 हजार 400 आणि खाजगी करीता 160 असे एकुण 1 हजार 560 क्षयरुग्णांचे उदिष्ट जिल्ह्यास देण्यात आले होते. त्यापैकी जानेवारी ते ऑगस्ट 2022 या कालावधीत शासकिय 842 आणि खाजगी क्षेत्राचे 85 असे एकुण 927 रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये 542 पुरुष आणि 385 महिलांचा समावेश होता. 927 क्षयरुग्णांपैकी सध्या स्थितीत 858 औषधोपचार सुरु असून फुस्फूसाने बाधित 643 आणि फुस्फूस व्यतिरिक्त इतर अवयवांचा आजार असणारे 215 क्षयरुग्ण आहे.
ऑगस्ट अखेर जिल्ह्याला 1040 क्षयरुग्णाचे उदिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी 927 रुग्णांची नोंद झाली असून त्यांचे प्रमाण 89 टक्के आहे. तर खाजगी क्षेत्रात 85 रुग्णांची नोंद झाली असून त्याचे प्रमाण 80 टक्के आहे. 188 क्षयरुग्ण हे औषधोपचार घेऊन पुर्णपणे बरे झाले असून 525 क्षयरुग्णांचा सद्या औषधोपचार घेत आहे. तर 26 क्षयरुग्ण हे इतर जिल्ह्यात उपचाराकरीता वळवल्या गेलेले असून 27 क्षयरुग्णांची मृत्युची नोंद झाली आहे.
या मोहिमेत शहरी भागातील 2 लक्ष 76 हजार आणि ग्रामिण भागातील 13 लक्ष 86 हजार लोकसंख्येमध्ये सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या मोहिमे दरम्यान आशा स्वयंसेविका व प्रशिक्षित स्वयंसेवकामार्फत घरातील सर्व सदस्यांची तपासणी करुन लक्षणे असणाऱ्यांची थुंकी नमुने तपासणी व क्ष-किरण तपासणी करुन बाधित असणाऱ्यांना मोफत औषोधोपचाराची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. रुग्णांना सोईचे व्हावे, म्हणुन औषोधोपचार जवळच्या आरोग्य उपकेंद्रात, प्राथमिक आरोग्य केंद्रात, ग्रामिण रुग्णालयात उपलब्ध आहे. तसेच फॅमिली डॉट्सची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे. यामध्ये रुग्णांस त्याचा घरातील प्रशिक्षित किंवा शिक्षित व्यक्तीकडुन औषोधोपचार दिला जातो. शासनाने 2025 पर्यंत क्षयरोग मुक्त भारत करण्याचे धोरण आखले असून त्यांचाच एक भाग म्हणुन ही मोहिम राबविण्यात येत आहे. ही मोहिम मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार व आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. तरंगतुषार वारे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. या कालावधित शहरी व ग्रामस्तरावर दवंडी व ध्वनीप्रक्षेपणाव्दारे जनजागृती करण्यात येणार असून आरोग्य कर्मचारी व सर्वेक्षणाकरीता येणाऱ्या स्वयंसेवकांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश असोले व जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.मनिष शर्मा यांनी केले आहे.
कुष्ठरोगाची लक्षणे
त्वचेवर फिकट, लालसर चट्टा येणे, त्वचेवर गाठी होणे, कानाच्या पाळ्या जाड होणे, भुवयांचे केस विरळ होणे, डोळे पूर्ण बंद करता न येणे, तळहातावर, तळपायावर मुंग्या येणे, मनगटापासून हात आणि घोट्यापासून पाय लुळा पडणे, त्वचेला थंड आणि उष्णता जाणीव न होणे, हात पायांमध्ये अशक्तपणा जाणवणे.
क्षयरोगाची लक्षणे
दोन आठवड्यापेक्षा जास्त कालावधीचा खोकला, ताप, वजनात लक्षणीय घट होणे, थुंकी वाटे रक्त येणे, मानेवर गाठ येणे.