मुंबई : राज्यातील शिंदे-भाजप सरकारने मोठा दिलासा देत गुरुवारी पेट्रोल लिटरमागे पाच रुपयांनी, तर डिझेल लिटरमागे तीन रुपयांनी स्वस्त केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संयुक्त पत्रपरिषदेत ही घोषणा केली. पेट्रोल, डिझेलवरील मूल्यवर्धित कर (व्हॅट) कमी करत सरकारने मोठा दिलासा दिला आहे.
आजच्या निर्णयामुळे मुंबईसह राज्यात बहुतांश ठिकाणी पेट्रोल १०६.८० रुपये, तर डिझेल ९४.८० रुपये प्रती लिटरवर आले. नवे दर गुरुवारी मध्यरात्रीपासून लागू करण्यात आले. फडणवीस विरोधी पक्षनेते असताना त्यांनी सातत्याने व्हॅट कमी करण्याची मागणी केली होती; पण महाविकास आघाडी सरकारने निर्णय घेतला नव्हता. शिंदे-फडणवीस यांनी सत्ता येताच पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट कमी करण्याची घोषणा केली होती, गुरुवारी ती अमलात आणली.
केंद्र सरकारने मे महिन्यात उत्पादन शुल्कात कपात केल्याने पेट्रोल व डिझेल दरात मोठी घट झाली होती. त्याच्या दोन दिवसांनी तत्कालीन राज्य सरकारनेही व्हॅट कमी केल्याचे सांगितले होते; पण त्याचा परिणाम दरांवर दिसला नाही. त्यामुळे २२ मेपासून पेट्रोल व डिझेलचे दर स्थिर होते. त्यावेळी राज्य सरकार पेट्रोलवर ३० रुपये ८२ पैसे, तर डिझेलवर २१ रुपये २६ पैसे प्रती लिटर व्हॅट आकारत होते. त्यामध्येच आता घट झाली आहे. विराेधी पक्षनेते अजित पवार यांनी मात्र या इंधन स्वस्ताईवर टीका केली.
सरकारवर ६ हजार कोटींचा बोजा
पेट्रोल, डिझेलवरील व्हॅट कमी केल्यामुळे सरकारवर ६ हजार कोटींचा अतिरिक्त बोजा पडणार आहे. मात्र, हा महसूल गेला तरी विकासकामांवर कोणताही परिणाम होणार नाही, याची सरकार काळजी घेईल.
एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री