अकोला दि. 5: आकांक्षा (कौशल्यातून जिवनोन्नतीकडे) कौशल्य विकास प्रकल्पातंर्गत ‘ॲडव्हान्स डिप्लोमा इन सॉफ्टवेअर प्रोग्रामिंग’ या प्रशिक्षणाचे आयोजन डॉ. पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधिनी येथे करण्यात आले आहे. या प्रशिक्षणात अमरावती विभागातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा व वाशिम येथील रहिवासी महिलांना सहभागी होता येणार आहे, सहभागासाठी द्यावयाच्या प्रवेश परीक्षेसाठी नाव नोंदणी करावी,असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे.
अमरावती विभागातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा व वाशिम येथील रहिवासी महिलांना रोजगाराच्या माध्यमातुन आर्थिक सक्षमता निर्माण करण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रवेश परिक्षेसाठी नोंदणी दि. 5 जुलै पासून सुरु झाली आहे. प्रशिक्षण प्रवेशाकरिता ऑनलाईन, ऑफलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. ऑनलाईन परिक्षा दि. 10 ते 23 जुलै या कालावधीत व ऑफलाईन परीक्षा दि. 24 जुलै रोजी घेण्यात येणार आहे. प्रवेश परीक्षेमध्ये चाळणी परीक्षा, इंग्रजी, सामान्य गणित व मुलाखत आदी घटकांचा समावेश असेल.
हे प्रशिक्षण महिलांकरिता निःशुल्क व निवासी स्वरुपाचे आहे. प्रशिक्षणाचा कालावधी 18 महिने पर्यंत असून वयोमर्यादा वय वर्षे 17 ते 28 दरम्यान, शैक्षणिक पात्रता 12 वी पास (विज्ञान, कला, वाणिज्य) आय.टी. आय. पास याप्रमाणे आहे.
ऑनलाईन प्रवेशासाठी http://bitly.ws/sAa8 या लिंकचा वापर करावा तसेच प्रवेशासाठी महिलांनी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या अमरावती येथील 9405102600,07212-566066, बुलडाणा-9757086603, 07262-242342, अकोला-8275369800, 07242-433849, यवतमाळ-837998798, 07232-244395, वाशिम-9096855798, 07252-231494 या कायालयाशी संपर्क साधावा असे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कार्यालयाने कळविले आहे.