अकोला,दि.३०: जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे शेतीशी निगडीत विविध तक्रारींचे निवारण करण्यासाठी येत्या सोमवार दि.४ जुलैपासून जिल्हाधिकारी निमा अरोरा ह्या दर सोमवारी आढावा घेणार आहेत, असे कृषी विभागाने कळविले आहे.
यासंदर्भात कृषी विभागाने कळविले आहे की, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पिक विमा योजना, हवामान आधारित फळपिक विमा योजना, स्वयंचलित हवामान केंद्र, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, पिक कर्ज, सावकारी प्रकरण, बियाणे व खाते मागणी, पोकरा इ.बाबत असलेल्या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी दर सोमवारी सभा आयोजित करण्यात येईल. ही सभा सोमवार दि.४ जुलै पासून दर सोमवारी सकाळी साडेदहा वा. जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला येथे होणार आहे. त्यासाठी संबंधित तक्रारदार शेतकऱ्यांनी स्वतः बैठकीस उपस्थित रहावे,असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. कांताप्पा खोत यांनी केले आहे.