अकोला जिल्ह्यातील अकोट तहसील अंतर्गत येणाऱ्या केळीवेळी गावात सामाजिक कार्यकर्ते, स्वा.सैनिक, त्यागमूर्ती ,ज्येष्ठ सर्वोदयी स्व रामकृष्णजी नामदेवराव आढे उपाख्य जानराव भाऊ यांचा जन्म दि. १ जुलै १९२३ मध्ये झाला .त्यांच्या मातोश्री प्रयानबाई ह्या हिवरखेड येथील कराळे परिवारातील लेक होत्या.त्यांचे शिक्षण केवळ चवथी पर्येंतच झालेले होते .पण कार्याचा अभ्यास केला तर ते मोठया शिक्षित माणसालाही फिक्के पाडणारे त्यांचे हे कार्य आहे.त्याचे बालपण हे स्वतंत्र पूर्व काळातील असल्यामुळे त्याच्या बालपणा पासूनच त्यांना स्वतंत्र मिळवण्यासाठी स्वतः पुढाकार घेऊन आपल्या गावातील,परिचयातील ,परिसरातीलच नव्हे तर अकोला, वाशीम, अमरावती,यवतमाळ व अन्य जिल्ह्यातील जनतेला विशेष करून नवयुवकाना सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले होते. ते स्वातंत्र्य लढ्यात कार्यरत होते .त्यांच्या कुशल संघटन वृत्तीने यशस्वी सुद्धा झाले होते. त्यांनी गावातच नव्हे तर संपूर्ण विदर्भात सर्वोदयी कार्यकर्ते घडवले,त्यांच्या कार्यामुळे आचार्य विनोबाजीच्या अतिशय जवळ पोहचले होते .आचार्य विनोबाजींचे निधन झाले तेव्हा विनोबाजींचे जवळचे कार्यकर्ते म्हणून जी मंडळी हजर होती त्यात आढेजी सुद्धा होते हे विशेष.
आढेजींनी वयाच्या 14 वर्षा पर्येंत शेती केली, देशात स्वातंत्र्याचे वारे वाहत असताना त्याचे मन शेतीकामात लागत नव्हते नंतर त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला. त्यांनी १९४२ साली चार महिन्याचा कारावास सुद्धा भोगला, स्वातंत्र्य लढा,सर्वोदय ,भूदान चळवळ, अनेक ठिकाणी स्वतः गौरक्षण संस्था उभारणी साठी पुढाकार घेतला.
त्याचा विवाह हा जुन्या चालीरीती प्रमाणे अकोट तालुक्यातील उमरा नजीक असलेल्या बेलुरा गावच्या साबळे परिवारातील चंद्रभागाबाई याच्याशी झाला होता त्यांना दोन मुली सुमनबाई आणि कुसुमबाई व दोन मुले वसंत ,क्रांतिकुमार असे चार अपत्य झाली होती
१९५९ साली अतिवृष्टी मुळे सर्वत्र पूरपरिस्थिती निर्माण झाली होती .त्यावेळी ते ग्रामदानी गावचा अभ्यास करण्यासाठी पालघर जिल्ह्यातील जव्हार गावात होते. त्यांना आपल्या गावची पूर परिस्थिती कळली असता, ते अकोला येऊन ते पूर्णा नदीला मोठा पुर असताना सर्व गावांचा जनसंपर्क तुटला होता. तेव्हा ते जीवाची पर्वा न करता गांधीग्राम वरून पूर्णा नदीपात्रात उडी घेऊन अपोटी पोहून गावात आले. आणि ग्रामस्थांना दिलासा दिला होता.
आढेजी सर्व प्रथम राष्ट्रीय शाळेपासूनच ते सर्वोदयाच्या विचारात ओढले गेले होते .आचार्य विनोबा भावे भूदान चळवळीत देशभर भ्रमंती करीत असताना रामकृष्णजी आढे गावातील कार्यकर्ते घेऊन दहीहांडा येथे सन १९६५मध्ये आचार्य विनोबाजीच्या आले असता त्यांच्या भेटीसाठी गेले होते. तेव्हापासून त्यांनी आचार्य विनोबाजी विचार प्रणाली नुसार जगण्याचा संकल्प त्यांनी केला त्याप्रमाणे केळीवेळी गावात त्यांना आमंत्रित करून त्यांनी ग्रामस्थांना ग्रामदानाचे महत्व पटवून दिले व येथील ग्रामपंचायतीचे दि २६ जून १९७२ साली विसर्जन करून येथे ग्रामपंचायत ऐवजी ग्राममंडळ स्थापन केले, प्रथम ग्राममंडळ अध्यक्ष होण्याचा बहुमान सुद्धा त्यांनी पटकवला, यावेळी गावातील अनेक शेतकऱ्याना ग्रामदान किसान सुद्धा केले ग्रामदान किसान झालेले शेतकरीच ग्राममंडळ अध्यक्ष पदासाठी पात्र ठरतात अशी ग्रामदान कायद्यात तरतूद आहे.
त्यांनी केळीवेळीचे ग्राममंडळ अध्यक्ष असताना ग्राममंडळाने गायरान भूमीमध्ये सामुदायिक शेती केली,सन १९८२-८३ मध्ये अमेरिकन कॉटन बियाणे निर्मितीचा प्रयोग सुद्धा गावात करण्यात आला त्याच वेळी केळीवेळी गावात सर्वोदय संमेलनाचे आयोजन त्यांनी केले या नंतर अकोला जिल्ह्यात सर्वोदय,भूदान चळवळ राबवली आणि अनेक कार्यकर्ते निर्माण केले अकोला जिल्ह्यात केळीवेळी सोबत आळंदा, सराव ही तर वाशीम जिल्ह्यात तुळजापूर ही गावे ग्रामदानी केली. केळीवेळी गावात गंगाप्रसाद अग्रवाल याच्या मदतीने पहिला सेंद्रिय खत निर्मितीचा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी सुरू केला होता .वाशीम जिल्ह्यातील लाठी येथे दिलीप बाबाना गोरक्षण संस्था उभारणीसाठी खूप मोठे सहकार्य केले तर मालेगाव येथील ‘जमनाबेन कुटमुटीया ट्रस्ट’ उभारणीसाठी भरीव कार्य केले,अश्या अनेक सामाजिक संस्थांना आपले सहकार्य देऊन हातभार लावला.
जयप्रकाश नारायण यांच्या संपर्कात आल्याने ते समाजवादी पक्षात सामील झाले होते पण त्यांना राजकारणापेक्षा समाजकारण अधिक प्रिय होते पण जयप्रकाशजींच्या आग्रहाखातर अकोट मतदार संघात विधानसभेची उमेदवारी घेतली होती त्यांच्या प्रचारात खुद्द जयप्रकाश नारायण हे प्रचारासाठी आले होते पण खूप मतदान झाले मात्र पराभव झाला नंतर त्यांनी राजकारणात कधीच भाग घेतला नाही.
गावात हनुमान मंदिरात सुरुवातीला आरती मंडळ स्थापन करून नंतर त्याचे रूपांतर हनुमान मंडळ असे नामांतर करून आज कबड्डीसाठी विदर्भात नावारूपाला आलेले हे हनुमान मंडळ असून विदर्भात “कबड्डीची पंढरी “म्हणून सर्व दूर नावलौकिक प्राप्त झाले आहे या मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सुद्धा आढेजीच होते.
तसेच ते येथील श्री सखाराम महाराज शिक्षण प्रगती मंडळाचे अध्यक्ष,अकोला जिल्हा सर्वोदय मंडळ अध्यक्ष व महाराष्ट सर्वोदय मंडळ अध्यक्ष आणि विदर्भ भूदान यज्ञ मंडळाचे सचिव म्हणून त्यांनी दहा वर्षे उत्कृष्ट कामगिरी केली .
महाराष्ट्रात सर्वाधिक आपल्या मालकीची शेत जमीन भूदान करणारे रा .कृ .पाटील यांच्या जास्त सानिध्यात राहल्यानेच त्यांनी प्रभावित होऊन स्वतःच्या मालकीची २३ एकरांपैकी १८ एकर २० गुंठे शेती ही गोरगरीब जनतेला भूदान म्हणून वाटून दिली,त्यानंतर त्यांनी गावातील ,परिसरातील शेतकऱ्यांना आपल्या मालकीची शेती गोरगरिबांना भूदान करा हे विचार मांडून स्वतः कडे असलेल्या शेती मधून दान देण्यासाठी तयार केले आणि सर्वत्र फिरून १० हजार एकर शेतीचे भूदान प्राप्त करून गोरगरिबांना वाटून दिले त्यांच्या या कार्याची खूप प्रशंसा झाली.
आढेजींनी स्वतः बाबत घेतलेला भूदानाचा निर्णय यावर कोणी काहीही विरोध केला नाही .त्यांच्या विचारावर कोणी हल्ला केला नाही. त्यांचे हिवरखेड येथील मामा मोतीराम कराळे यांनी त्यांच्या कुटुंबाला उदरनिर्वाहासाठी अपुरी पडेल या हेतूने त्यांना १० एकर शेती विकत घेऊन दिली.
त्याच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना १९९७ साली जमनाबेन कुटमुटिया ट्रस्ट मालेगाव तर्फे “लोकसेवक पुरस्कार “बहाल करण्यात आला होता. हा पुरस्कार २१००० हजाराची नगद रक्कम मिळाली ती रक्कम त्यांनी केळीवेळी स्थानिक विकासासाठी ग्राम मंडळास दान केली होती ,१९८८ चा ‘ब्रजलाल बियाणी पुरस्कार,” वर्धा येथील म. बा. गांधी ट्रस्ट द्वारा दिल्या जाणाऱ्या “जाजू पुरस्कार” चा ज्येष्ठ सर्वोदयी म्हणून त्यांना मिळाला होता,तसे त्यांना अनेक पुरस्कार मिळाले होते तर त्याचे सत्कार ही खूप ठिकाणी घेण्यात आले होते
आढेजीनी वृद्धपकाळात सुद्धा आपले कार्य सुरूच ठेवले होते .अखेर वयाच्या ८२वर्षाचे असताना दि १७ मे २००५ रोजी त्यांनी जगाचा निरोप घेतला .त्यांच्या अंत्ययात्रेला देशभरातील त्यांचे प्रेमीजण बहुसंख्येने उपस्थित होते. त्यांच्या अंतिम इच्छेनुसार त्यांचे नेत्रदान केले. आणि अंतिम संस्कार हे अत्यंत सध्या पद्धतीने केले होते .त्याच्या मृत्यूनंतर सर्व प्रकारचे पिंडदान, तेरवीचा कार्यक्रम रद्द करण्यात आला होता.
आढेजी यांच्या निधनानंतर त्याच्या स्मृतिनिमित्य प्रथम स्मृतिदिना पासूनच दर वर्षी दि १७ मे रोजी हनुमान मंडळाने विदर्भस्तरावर विदर्भभूषण क्रीडा पुरस्काराचे वितरण सुरू केले आहे दर वर्षी हा पुरस्कार विदर्भात विशेष कामगिरी करणाऱ्यास दिल्या जातो या दिवशी त्यांच्या स्मृतीस उजाळा मिळत राहतो हे विशेष .