अकोला दि.11:- उन्हाळ्याच्या तीव्र झळा….स्मृतीकोषातल्या गर्द झाडी आणि दाट सावलीची हमखास आठवण करुन देतात. काँक्रीटच्या जंगलात अशी सुखद सावली दुरापास्तच. मात्र वन विभागाने ही करामत करुन दाखवलीय. शिवापूर ता. अकोला येथे अर्धा हेक्टर क्षेत्रावर जपानी ‘मियावाकी’ पद्धतीने 16,500 झाडे जगवून ‘अटलआनंदवन’ साकारले आहे. भरपूर ऑक्सिजन आणि सुखद गारवा देणारी सावली; वैशाख वणव्यातही या अनुभूतीची प्रचिती येते.
अकोला प्रादेशीक वनवृत्तातील लोणी नियतक्षेत्रात मौजे शिवापूर येथे एकेकाळी खडकाळ व मुरमाड जमिन असलेल्या ठिकाणी हे ‘अटल आनंदवन’ साकारले आहे. जिल्हा वार्षिक योजनेच्या नाविन्यपूर्ण योजनेतून या उपक्रमासाठी 27 लक्ष 39 हजार 418 रुपयांचा निधी देण्यात आला. त्यात सन 2020 च्या पावसाळ्यात याठिकाणी ही झाडे लावण्यात आली. केवळ दोनच वर्षात उत्तम देखभाल आणि ‘मियावाकी’ पद्धतीच्या वैशिष्ट्यांमुळे आज ही झाडे उंचच उंच झाल्याचे दिसून येत आहेत.
‘मियावाकी’ पद्धत
जापानी वनस्पती शास्त्रज्ञ अकिरा मियावाकी यांनी ही पद्धत शोधून काढली आहे. या पद्धतीत कमी भूक्षेत्रावर विशिष्ट पद्धतीचा अवलंब करुन दाटीवाटीने झाडे लावण्यात येतात. त्यात उंच वाढणारी झाडे, मध्यम उंचीची फळांची वा अन्य झाडे तसेच लहान उंचीची झुडपे (ज्यात फुलांची झाडे इ.) अशी संमिश्र पद्धतीने लावण्यात येतात. या पद्धतीमुळे झाडांमध्ये अन्न तयार करणे (प्रकाशसंश्लेषण), पाणी मिळविणे(मुळांची वाढ) या आवश्यक गरजांसाठी नैसर्गिक स्पर्धा निर्माण होऊन त्यांची वाढ होते. मोठ्या झाडांमुळे लहान झाडांचे संरक्षण व संगोपन होते. नैसर्गिक पद्धतीने फुलधारणा, परागिभवन, फलधारणा, पानगळ यासारख्या वृक्षांच्या जीवनचक्रातील टप्पे ही वृक्षांना एकमेकांना वाढण्यासाठी सहाय्यिभूत ठरतात. अकिरो मियावाकी यांनी ही पद्धत पडिक जमिनींचा नैसर्गिक पद्धतीने विकास करण्यासाठी शोधली व त्यास चालना दिली होती.
अर्धा हेक्टरवर 16,500 झाडे
वन परिक्षेत्र अधिकारी आर. एन.ओवे यांनी या उपक्रमाविषयी माहिती दिली. शिवापूर येथे वनविभागाने अर्धा हेक्टर क्षेत्रावर 16,500 झाडे लावली आहेत. त्यात उंच वाढणारी वड, पिंपळ, कडुनिंब, काटसाबर, उंबर,शेवगा, अर्जून, धावडा, बेल, शमी, बहावा, बांबू इ., मध्यम उंचीची पेरू, सिताफळ, पारिजातक, बदाम, आवळा, अडुळसा इ. तर लहान झुडुपांमध्ये मोगरा, तुळस, जास्वंद, शंकासूर इ. झाडे लावण्यात आली. लहान व मध्यम झाडांमध्ये औषधी वनस्पती, फुले व फळे देणाऱ्या झाडांची निवड करण्यात आली. त्यामुळे पक्षी आकर्षित होऊन नैसर्गिक परागिभवनाला चालना मिळते.
झाडे लावण्याची शास्त्रीय पद्धत
‘मियावाकी’ पद्धतीनुसार झाडे लावतांना 5 मिटर X20 मिटर या प्रमाणे पट्टे तयार करण्यात आले. जमिन खोल करुन त्यात गवत, वाळलेल्या वनस्पती, कोकोपिट, भुसा, लाकडाचे तुकडे, चुरा, काळी माती असे थर देण्यात आले. त्यानंतर रोपे लावण्यात आली. या सर्व रोपांना संरक्षणासाठी कुंपण करण्यात आले आहे. तसेच रोपांना ठिबक संचाद्वारे पाणी देण्याची व्यवस्था करण्यात आली. रोपांच्या देखभालीसाठी दोन वनमजूर नेमण्यात आले.संरक्षणाच्या दृष्टीने रात्री प्रकाश असावा यासाठी सौरदिवेही बसविण्यात आले आहेत.
अवघ्या दोन वर्षात उंचचउंच झाडे
उत्तम देखभाल व संरक्षण व्यवस्था पुरविल्यामुळे याठिकाणी झाडांची वाढ उत्तम व निकोप झाली आहे. 15 ते 20 फुटांहून अधिक उंच झाडे झाली आहेत तर लहान व मध्यम उंचीच्या झाडांची वाढही जोमदार आहे. फुलझाडांना फुले तर फळझाडांना फळेही आली आहेत.
अटल आनंदवनाचे फायदे
लागवड केलेली सर्व झाडे जगली व वाढली आहेत. या परिसरात गारवा निर्माण झाला आहे.अनेक किटक, फुलपाखरे यांची वर्दळ वाढली आहे. साहजिकच हे किटक ज्यांचे भक्ष्य आहे त्या पक्षांची वर्दळ मोठ्याप्रमाणावर सुरु झाली आहे. पक्षांची किलबिल वाढली आहे. त्याचा परिणाम वातावरणातील आल्हाददायकता वाढण्यात झाला आहे. सरपटणारे व लहान खारुताई सारखे प्राणीही तेथे आता कायम वास्तव्यास असतात. कुंपणामुळे मोठे व तृणभक्षी प्राण्यांना मज्जाव आहे. अनेक झाडांना फुले, फळे, शेंगा लागली आहेत. हंगामानुसार होणाऱ्या पानगळीमुळे पानांचा खच पडून व तो तिथेच कुजून जमिनीचा पोत सुधारला आहे.
या यशस्वी उपक्रमामुळे उन्हाळा ऋतूत वणव्याची दाहकता असणाऱ्या अकोला जिल्ह्यात काहीतरी सुखद, नैसर्गिक, गार निर्माण करता येऊ शकते या सुखवार्तेची आशा पल्लवित झाली आहे. जिल्ह्यातल्या इतर भागातही असे वनपट्टे निर्माण करायला आपसूक प्रेरणा निर्माण झाली आहे.