पुणे: मान्सूनच्या आगमनाची वर्दी आलेली असली, तरी आणखी चार दिवस उन्हाची काहिली देशवासीयांना सहन करावी लागणार आहे. उत्तरेकडून महाराष्ट्रापर्यंत उष्णतेच्या लहरी सक्रिय होत आहेत. सोमवारपासून गुरुवारपर्यंत ही लाट देशात राहणार आहे. उष्णतेचा पारा 42 ते 45 अंशांवर जाण्याचा इशारा हवामान खात्याने रविवारी दिला. महाराष्ट्रात सर्वसाधारण तापमानात वाढ होईल, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात उष्म्याचा ‘अलर्ट’ देण्यात आला आहे.
हिमालयाच्या पायथ्याशी पश्चिमी चक्रवात तसेच उत्तर प्रदेश व बिहारमध्ये वार्यांची चक्रीय स्थिती निर्माण झाल्याने उत्तर भारतात उष्ण लहरी सक्रिय होत आहेत. बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ आल्याने तिकडून दमट वारे वाहत आहेत. या दोन्हीचा परिणाम म्हणून आगामी चार दिवस देशभर उष्णतेची लाट तीव्र होणार आहे.
दिल्ली, पंजाब, राजस्थान, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरात व महाराष्ट्र यात भाजून निघणार आहे. या राज्यांतील कमाल तापमानात 2 ते 4 अंशांनी वाढ होऊन ते 42 ते 45 अंशांवर जाणार असल्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे.