महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणार्या विविध स्पर्धा परीक्षांपैकी महाराष्ट्र गट ‘क’ सेवा परीक्षा (MPSC Group C Exam) ही एक महत्त्वाची परीक्षा. ही परीक्षा (MPSC Group C Exam) देण्यासाठी उमेदवाराकडे नेमकी कोणती अर्हता तसेच परीक्षा पद्धत याविषयी या लेखातून माहिती मिळवू. प्रस्तुत परीक्षेमार्फत एकूण पाच पदे भरण्यात येतात. ज्यामध्ये उद्योग निरीक्षक, दुय्यम निरीक्षक, तांत्रिक सहायक, कर सहायक व लिपिक टंकलेखक.
अर्हता :
1) वयोमर्यादा – उमेदवाराचे वय किमान व कमाल वय या सीमा रेषेत गणले जाते. हे वय प्रवर्गनिहाय भिन्न असते. याव्यतिरिक्त कमाल वयोमर्यादेमध्ये दिव्यांग उमेदवारांसाठी वयाची 45 वर्षे इतकी सूट असते.
2) शिक्षण : उद्योग निरीक्षक – स्थापत्य/स्थापत्य अभियांत्रिकीमधील विषयांच्या गटांशी संलग्न वास्तुविद्या, नगररचना इ. विषयांव्यतिरिक्त किंवा तंत्रज्ञानामधील पदविका किंवा विज्ञान शाखेतील पदवी.
इतर पदांसाठी – मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी. पदवीच्या शेवटच्या वर्षाला असणारे उमेदवार हे पूर्व परीक्षेस पात्र असतील. मात्र, मुख्य परीक्षेसाठी अर्ज करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील.
3) विशिष्ट अर्हता : अ) दुय्यम निरीक्षक
पुरुष उमेदवार – उंची – किमान 165 सें.मी. (अनवाणी), छाती – किमान 79 सें.मी. फुगवून जास्तीचा 5 सें.मी. फरक.
महिला उमेदवार – उंची – किमान 155 सें.मी. (अनवाणी), वजन – किमान 50 कि.ग्रॅ.
ब) कर सहायक व लिपिक टंकलेखक
या पदांसाठी – मराठी 30 व इंग्रजी 40 अशाप्रमाणे टंकलेखनाचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र उमेदवाराकडे असावे.
परीक्षेच्या संधी – आयोगाने केलेल्या बदलानुसार उमेदवारास आता परीक्षेच्या कमाल संधीची अट बंधनकारक आहे. ज्यामध्ये अराखीव खुला प्रवर्गासाठी कमाल संधीची मर्यादा ही 6, तर उर्वरित मागासवर्गासाठी 9; मात्र एससी व एसटी प्रवर्गासाठी ही अट लागू होत नाही.
परीक्षेचे टप्पे –
1) पूर्व परीक्षा – प्रस्तुत सर्व पदांसाठी एकच संयुक्त पूर्व परीक्षा घेतली जाते. यासाठी उमेदवारांना आपण कोणत्या पदासाठी इच्छुक आहोत यासंबंधी विकल्प द्यावे लागतात. पूर्व परीक्षा 100 गुण, 100 प्रश्न व 1 तास वेळ या स्वरूपात असते. वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपामुळे 25 टक्के नकारात्मक गुण पद्धत असते. सर्व पदांसाठी स्वतंत्र निकाल जाहीर होतो.
2) मुख्य परीक्षा – एकूण 200 गुणांची संयुक्त पेपर क्र. 1 व स्वतंत्र पेपर क्र. 2 अशाप्रकारे प्रत्येकी 100 गुणांचे दोन पेपर असतात. दोन्ही पेपरचे गुण एकत्र करून अंतिम निकाल लावण्यात येतो. पूर्व परीक्षेचे गुण अंतिम निवडीसाठी ग्राह्य धरले जात नाहीत.