तेल्हारा-लघुशंकेकरिता घराबाहेर गेलेल्या एका ५० वर्षीय विधवा महिलेला तोंड दाबून तिच्याच घरात नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याची घटना तालुक्यात ता. १० एप्रिल रोजी रात्री १२ वाजताच्या सुमारास घडली.
विधवा महिला लघुशंकेकरिता बाहेर आली असता, आरोपी श्याम विश्वासराव अढाऊ (रा.माळेगाव बाजार) हा आपला साथीदार अजय खारोडे (रा. आंबोड ता. अकोट) याच्यासह पीडितेच्या घरी आला व पीडितेचे तोंड दाबून तिला तिच्याच घरात नेऊन तिच्यासोबत जबरीने अत्याचार केला.
त्यादरम्यान त्याचा साथीदार अजय खारोडे हा बाहेर पाळत ठेवत होता. घटनेच्या वेळी पीडित महिलेच्या बांगड्याचा आवाज ऐकल्याने तिची वहिनी तिथे आली असता, दोन्हीही आरोपी घटनास्थळावरून पळून गेले.. या प्रकरणाची पीडित महिलेने ता. ११ एप्रिल रोजी तेल्हारा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली.
पीडितेच्या तक्रारीवरून •आरोपी श्याम विश्वासराव अढाऊ (रा.. माळेगाव बाजार), साथीदार अजय खारोडे (रा. आंबोड ता. अकोट) या दोघांविरोधात शहर पोलिस स्टेशनमध्ये अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार व विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी रितू खोकर करत आहेत.