अकोला– येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून आयोजित श्रमसंस्कार शिबिराद्वारे सिसा बोंदरखेड या गावात लोकोपयोगी कामे करुन दिलीत. या उपक्रमामुळे सिसा बोंदरखेड गावच्या गावकऱ्यांना कौशल्य दुतांच्या श्रमसंस्कारांची आगळीवेगळी अनुभूती आली आहे.
सिसा बोंदरखेड ता. अकोला या गावात मंगळवार दि.२२ ते सोमवार दि.२८ या कालावधीत हे श्रमसंस्कार शिबिर पार पडले. या शिबिरात सुमारे १०० विद्यार्थी – विद्यार्थिनी सहभागी झाले होते. याशिबिरात विद्यार्थ्यांनी गावात जाऊन आपापल्या व्यवसाय गटानुसार गावातील लोकांची तसेच गावासाठी आवश्यक सार्वजनिक सुविधांची कामे करुन दिली. त्यात प्रामुख्याने ग्रामस्वच्छता अभियान, ग्रामपंचायत कार्यालय, शाळा, अंगणवाडी येथे लोखंडी गेट बसविणे, कमान करुन देणे, शाळेतील फरशी दुरुस्ती, समाजमंदीर दुरुस्ती , मंदिरातील इलेक्ट्रिक फिटींग, पथदिव्यांच्या खांबांना रंगरंगोटी. गटारांची स्वच्छता, सार्वजनिक जागा उदा. स्मशानभुमि परिसरातील स्वच्छता व डागडुजी, सार्वजनिक विहिर परिसराची स्वच्छता व डागडुजी, गावातील सार्वजनिक भिंतींवर घोषवाक्ये लिहिणे इ. विविध प्रकारची कामे या विद्यार्थ्यांनी केली.
हे सर्व विद्यार्थी हे कौशल्य विकास प्रशिक्षणाचे विद्यार्थी असल्याने त्यांनी आपापल्या व्यवसाय गटानुसार कामे केली. बांधकाम विभागाच्या विद्यार्थ्यांनी बांधकामाची कामे केली. इलेक्ट्रिशियन अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी इले. फिटिंग, गावातील लोकांची उपकरण दुरुस्ती इ. कामे मोफत करुन दिली. वेल्डर शाखेच्या विद्यार्थ्यांनी लोखंडी गेट, कमानी तयार करण्याचे काम करुन दिले. रंगकाम शाखेच्या विद्यार्थ्यांनी झाडांचे बुंधे रंगवून दिले. तसेच हातपंप दुरुस्त करुन रंगवून दिले. सर्व विद्यार्थ्यांनी श्रमदानातून गावात स्वच्छता मोहिम राबविण्यासोबतच गावात एक वनराई बंधाराही तयार करुन दिला आहे.
या सोबतच विद्यार्थ्यांनी गावातील युवकांना कौशल्य विकासाचे महत्त्व समजावून दिले. कौशल्य विकासातून स्वयंरोजगाराचे महत्त्व पटवून दिले.या सात दिवसांच्या शिबिर कालावधीत विद्यार्थ्यांसाठी अनेक प्रबोधनात्मक तसेच व्यक्तिमत्व विकासासाठी विविध मान्यवरांची व्याख्याने आयोजित करण्यात आली.
प्राचार्य पी.एन. जयस्वाल यांच्या सह उपप्राचार्य एस. पी. झोडपे, एस. आर. ठोकरे, कार्यक्रम अधिकारी व्ही.टी. मगर, एस. एम पिसे यांनी तसेच त्यांच्या सहकारी निदेशकांनी शिबिर आयोजनासाठी परिश्रम घेतले.