अकोला– येथील जवाहर नवोदय विद्यालयाच्या चार बालचित्रकार असलेल्या विद्यार्थिनी यांनी ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमासाठी निमंत्रण आले आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मार्गदर्शन लाभणार असून स्वतः पंतप्रधान या विद्यार्थिनींच्या चित्रकृतींचे निरीक्षण करणार आहेत.
जवाहर नवोदय विद्यालय अकोला येथील प्राचार्य आर. एस. चंदनशिव यांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या शुक्रवारी दि.१ एप्रिल रोजी नवी दिल्ली येथे ‘परीक्षा पे चर्चा’ हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात सहभागासाठी गायत्री लांडे, तेजस्विनी घोरमारे, आयुषी गजभिये, अनुष्का खेवले या चार बालचित्रकार असणाऱ्या विद्यार्थिनींना निमंत्रित करण्यात आले आहे. या कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी स्वतः या विद्यार्थिनींच्या चित्रकृतींचे निरीक्षण करणार आहेत.
जवाहर नवोदय विद्याल्य अकोला येथे डिसेंबर २०२१ मध्ये नवोदय विद्यालय समिती पुणे यांच्या मार्फत कला महोत्सव आयोजित करण्यात आला होता. त्यात २१ विद्यार्थ्यांना चित्रकला, शिल्पकला, पेपर प्रिंटींग, निसर्ग चित्र, आधुनिक चित्र इ. साठी दृष्य कला कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थिनींनी या कार्यशाळेत तयार केलेल्या चित्र, शिल्प इ. ची विभागीयस्तरावर निवड होऊन नंतर अखिल भारतीय स्तरावर निवड झाली आहे. त्यातून या विद्यार्थिनींना दि.१ एप्रिल रोजी नवी दिल्ली येथे होणाऱ्या ‘ परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आले आहे.