मुंबई : रशिया आणि युक्रेनमध्ये होत असलेल्या वादाचा जगासह देशावर मोठा परिणाम होताना दिसत आहे. अनेक दिवसांपासून रशिया आणि युक्रेन (russia ukraine war) यांच्यात युद्ध होईल अशी चर्चा सुरू होती. दरम्यान आज पहाटेपासून या दोघांमध्ये युद्धाची ठिणगी पडली. या युद्धाचे परिणाम भारतासह जगभरातील शेअर बाजारावर होताना दिसून येत आहे. या युद्धामुळे भारतातील शेअर बाजार उच्चांकी २७०० अंकांनी कोसळला आहे.
निफ्टीमध्ये ८१५ अंकांची घसरण होत 16248 वर निफ्टी आला आहे. तर सेन्सेक्समध्ये २७०२.१५ अंकांची घसरण होऊन ५४५२९.९१ वर आला.
भारतातील नामांकित कंपन्यांना याचा मोठा फटका बसला आहे. हिरो मोटोकॉर्प आणि टाटा मोटर्सला सर्वात जास्त फटका बसला आहे. टाटा मोटर्सचे शेअर्स जवळपास १०.२८ टक्क्यांनी घसरला आहे. सध्या ४२७.९ वर आला आहे. टाटा पॉवरच्या शेअरमध्येही मोठी घसरण झाली आहे.
तर हिरो मोटो कॉर्पचा शेअर ६.७५ टक्क्यांनी कोसळला. जिंदाल स्टील ८.२४ टक्के, बंधन बँक ७.७० टक्के, आरबीएल बँक ११.८६, गोदरेज प्रॉपर्टीज ९.११, एलआयसी फायनान्स ९.८ टक्क्यांनी घसरले. रिलायन्सचा शेअर देखील ४.९८ टक्क्यांनी कोसळला आहे. याचबरोबर टेक महिंद्राच्या शेअर्समध्येही पाच टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे.
काल (दि.२३) युक्रेनने आणीबाणी जाहीर केली. यानंतर अमेरिकन बाजार मोठ्या प्रमाणात कोसळला. आज (दि.२४) सर्व आशियाई बाजार कोसळले आहेत. चीनचा शांघाय कंपोझिट जवळजवळ स्थिर आहे, परंतु जपानचा निक्केई किंवा दक्षिण कोरियाचा कोस्पी, या सर्वांमध्ये मोठी घसरण झाली आहे.