अकोला, दि.१४: – यंदा पर्जन्यमान अधिक व अधिक काळ झाल्याने जिल्हा व ग्रामीण भागात भुजल पातळीत वाढ झाली आहे. सद्यास्थितीत पाणी टंचाई उद्भवेल अशी परिस्थिती नाही. तथापि, माहे एप्रिल ते जून या महिन्यांत पाणी टंचाईची संभाव्यता लक्षात घेता, संभाव्य टंचाईग्रस्त भागातील सर्वेक्षण करुन आराखडा तयार करा, असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिले.
जिल्हा व ग्रामीण भागातील पिण्याच्या पाणी टंचाई व उपाययोजना संदर्भात आढावा आज घेतला. निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एस.डब्लू कावळे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे कार्यकारी उपअभियंता एन.एम. राठोड, जिल्हा परिषद यांत्रिकी विभागाचे उपअभियंता एस.बी. मेढे, पाणी पुरवठा विभागाचे सहायक भुवैज्ञानिक पी.पी. बरडे, भुजल सर्वेक्षण विकास यंत्रणाचे कनिष्ठ भुवैज्ञानिक निलेश इंगळे आदी उपस्थित होते.
भुजल सर्व्हेक्षण व विकास यंत्रणेमार्फत सादर केलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात सरासरी भुजल पातळी १०.८४ मिटर्स इतकी असून २०१७ पासूनच्या सरासरी पातळीपेक्षा ही पातळी ०.९० मिटर्स इतकी वाढली आहे.
जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी निर्देश दिले की, संभाव्य टंचाई लक्षात घेवून पाणी टंचाईग्रस्त भागाचे रितसर सर्वेक्षण करुन आराखडा तयार करा. गरजेच्या ठिकाणीच पाणीपुरवठा होईल, याची दक्षता यंत्रणांनी घ्यावी. ग्रामस्तरावरील पाणी टंचाईच्या मागणीनुसार उपाययोजना करा, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.