हिवरखेड: हिवरखेड तळेगाव दरम्यान केळीच्या शेतात एक अत्यंत मोठे अस्वल ठाण मांडून बसल्याने शेतकऱ्यात भीती पसरले असून हिवरखेड आणि आजूबाजूच्या परिसरात मागील काही काळात वाघ, बिबट, तडस, अस्वल, जंगली डुक्कर, इत्यादी हिंस्त्र वन्यपशुसह हरण, नीलगाय, जंगली रेडा, माकडं, आणि ईतर वन्यप्राण्यांनी चांगलाच उधम माजविला असून हिंस्त्र पशू शेतकऱ्यांच्या पाळीव प्राण्यांच्या शिकारी करीत आहेत तर इतर प्राणी शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान करीत आहेत. हिंस्त्र पशूंच्या वावरामुळे जीवितहानीची शक्यता निर्माण झाली असून मेळघाटच्या सीमेवर जाळीचे कुंपण घालणे अत्यंत आवश्यक झाले असून अकोला अमरावती बुलढाणा या तीन जिल्ह्यांच्या सीमेजवळ आणि मेळघाट पासून हाकेच्या अंतरावर वसलेल्या हिवरखेड येथे वन्य प्राणी रेस्क्यू सेंटर उभारण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते धिरज बजाज यांनी केली आहे. जेणेकरून माहिती मिळताच तात्काळ वन्यप्राण्यांचे रेस्क्यू करून त्यांना जंगलात त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडता येईल.
दिनांक 31 जानेवारी रोजी पहाटे सुधाकर गावंडे, रामदास गावंडे, वैभव गावंडे, अंकेश ताथोड, प्रवीण गावंडे, तुषार गावंडे, विश्वनाथ गावंडे, केशवराव गावंडे, किशोर गावंडे, उद्धव खराबे, गौरव गावंडे इत्यादी शेतकरी शेतात गेले असता सुधाकर गावंडे यांच्या शेतात केळीच्या पिकामध्ये मोठ्या अस्वलाने ठाण मांडले असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. सदर अस्वलाला पाहून शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. समयसूचकता बाळगून शेतकऱ्यांनी सदर माहिती तात्काळ पोलीस पाटील प्रकाश गावंडे, सुरज चौबे, धिरज बजाज इत्यादींना दिली. ह्या सर्वांनी तात्काळ वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन रेस्क्यू साठी येण्याची विनंती केली. त्यामुळे वनाधिकारी तायडे आणि त्यांची चमू लवकरच घटनास्थळी पोहोचली आणि वरिष्ठांच्या निर्देशानुसार अस्वलाचा रेस्क्यू साठी जाळे, स्टिक इत्यादी साहित्यासह आवश्यक पावले उचलण्यास सुरुवात केली. तसेच डॉट मारून बेशुद्ध करण्यासाठी अमरावती येथील चमूला पाचारण करण्यात आले होते. वृत्त लिहिस्तोवर अमरावती येथील चमू पोहोचण्यात होती.