पातूर: (सुनिल गाडगे) शहरालगत असलेल्या शेतात शेकडोंच्या संख्येने गुरेढोरे कळपात येऊन पिकांची नासधूस करणाऱ्या मोकाट जनावरांमुळे पातूर शहरातील शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. दुसरीकडे मागणी करूनही या जनावरांच्या बंदोबस्तासाठी प्रशासनाकडून पावले उचलली जावी अशी मागणी होतं आहे . खरीपातील तूर पीक व रब्बी हंगामातील उगवलेले गहू हरभरा पीक मोकाट जनावरांकडून नष्ट होत असल्याने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.
शहरांत मागील तीन तें चार आठवड्यापासून शहरातील मोकाट जनावरांनी शेतातील पिकाचे मोठे नुकसान केले आहे.दिवसा मोकाट जनावरे कळपाने गावात, नवीन वस्तीत किंवा दाट झाडीत मुक्काम करतात व रात्री परिसरातील शिवारातील खरिपाच्या पिकासह रब्बी पिकांना हा कळप लक्ष्य करतो. आठवडाभरापूर्वी या मोकाट जनावरांनी जिरायत पातूर या भागातील बोंबटकार यांचे शेतातील तूर संपवून टाकली तसेच ईतर शेतकऱ्याचे मोठे नुकसान केले आहे.
याशिवाय परिसरातील शेकडो एकरावरील खरिपाच्या तूर व रब्बी हंगामातील गहू हरभरा पिकाचे या मोकाट जनावरांनी उगवणीनंतर चांगलेच नुकसान केल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.
मोकाट जनावरांपासून आपल्या पिकाचे रक्षण करण्यासाठी या शिवारातील शेतकऱ्यांना रात्री बेरात्री जीव धोक्यात घालून गस्त घालण्याशिवाय किंवा जागरण केल्याशिवाय पर्याय शिल्लक राहिला नसून ऊन,पाऊस, वारा वादळ व इतर धोके पत्करून रात्रीच्या वेळी शेतकऱ्यांना शेतात जीव धोक्यात घालून जागरण करण्याची वेळ आली आहे.
शेतकऱ्यांनी आता प्रशासनास निवेदन देण्याचे ठरविले असून शेती पिकांचे नुकसान करणाऱ्या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याच्या मागणीसाठी शहरातील त्रस्त शेतकऱ्यांनी प्रशासनास निवेदन देण्याचे ठरविले आहे. प्रशासनाने कार्यवाही करून होणारे नुकसान टाळण्यासाठी सहकार्य करावे अशी मागणी त्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.