कुन्नूर: लष्कराने गाव दत्तक घेतले : हेलिकॉप्टर अपघातातील जनरल सीडीएस आणि त्यांच्या अन्य सहकाऱ्यांच्या मृत्यूनंतर कुन्नूरनजीकच्या छोट्या गावाला आता लष्कराने दत्तक घेतले आहे. पीडितांना मदत आणि ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांना वाचविल्याप्रकरणी लष्कराने आभार मानत त्यांना आवश्यक सोयी सुविधा देऊ केल्या आहेत.
सीडीएस जनरल बिपिन रावत यांना घेऊन जाणाऱ्या भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरचा अपघात झाल्यानंतर १४ पैकी १३ जणांचा त्यात मृत्यू झाला तर ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांना वाचविण्यात यश आले. ग्रामस्थांनी तातडीने सर्वांना उपचारासाठी नजीकच्या रुगालयात दाखल केले. रावत यांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर त्यात त्यांच्या पत्नीसह अधिकारी आणि कर्मचारी मृत्यूमुखी पडले होते.
हेलिकॉप्टर पडल्यानंतर झालेल्या आवाजानंतर लोक तातडीने तेथे धावत गेले. त्यांनी जखमी असलेल्या रावत आणि वरुण सिंग यांना उपचारासाठी नेले. मात्र, गंभीर जखमी झालेल्या रावत यांचा वाटेत मृत्यू झाला होता. तर वरुण सिंग यांना वाचविण्यात यश आले. पीडितांसाठी गावकरी ‘देवांसारखे’ असल्याचे लष्कराने म्हटले आहे. भारतीय लष्कराने तामिळनाडूच्या या ग्रामस्थांचे आभार मानत मदत करण्याचेही ठरवले आहे.
लष्कराने म्हटले आहे की, ‘तुमच्यापैकी अनेकांनी मदत केली. गावकऱ्यांच्या मदतीशिवाय १४ लोकांना वेळेत रुग्णालयात पोहोचवता आले नसते. एक हवाई दलाचा अधिकारी जिवंत आहे आणि तो बंगळूरचा आहे. ते हॉस्पिटलमध्ये जीवन आणि मृत्यूशी झुंज देत आहे. जर तो जिवंत असेल तर त्याचे कारण तुम्ही आहात. तुम्ही त्या १४ लोकांसाठी देवासारखे होतात. तुमचे खूप खूप आभार.’
जनरल ऑफिसर कमांडिंग हेडक्वार्टर दक्षिण भारत, लेफ्टनंट जनरल ए अरुण यांनी सांगितले की, ‘वाचलेले ग्रुप कॅप्टन वरुण सिंग आपल्या आयुष्यासाठी लढत होते. त्यावेळी ग्रामस्थ त्यांच्या मदतीला धावले. त्यामुळे त्यांचे प्राण वाचले. या कामाची पोचपावती म्हणून गावात सभा व कार्यक्रमांसाठी शेड बांधण्यात येणार आहे.
त्यांनी भारतीय सैन्याच्या दक्षिण भारताच्या मुख्यालयाच्यावतीने हे गाव दत्तक घेण्याची घोषणा केली आहे. या गावात ब्लँकेट, रेशन साहित्य आणि सौर दिव्यांचे वाटप केले. लेफ्टनंट जनरल ए अरुण यांनी तामिळनाडू सरकार, मुख्यमंत्री एमके स्टॅलिन आणि विविध विभागांच्या सचिवांचे बचावकार्यात केलेल्या भूमिकेबद्दल आभार मानले.