अकोला: दि.४ : जिल्ह्यात १४ जिल्हा परिषद निवडणुक विभाग व २८ पंचायत समिती गणात होत असलेल्या पोटनिवडणुकीसाठी उद्या दि.५ रोजी मतदान होत आहे. या मतदानासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व सज्जता केली असून यानिवडणूकीत तीन लाख ७१ हजार ६९० मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील. जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या १४ निवडणूक विभागांमध्ये ६८ उमेदवार तर पंचायत समितीच्या २८ गणांमध्ये ११९ उमेदवार निवडणूक लढवत आहेत.
४८८ मतदान केंद्र
जिल्हा परिषद व त्याअंतर्गत पंचायत समितीमधील रिक्त पदाच्या पोट निवडणुकीसाठी जिल्ह्यात 488 मतदान केंद्र व तालुकास्तरावर मतमोजणीची ठिकाणे निश्चित करण्यात आले आहे. निवडणुक आयोगाच्या कार्यक्रमानुसार मंगळवार दि. 5 ऑक्टोंबर रोजी मतदान व बुधवार दि. 6 ऑक्टोंबर रोजी मतमोजणी होणार आहे. त्यानुसार अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात 77, अकोट तालुक्यात 81, मुर्तिजापूर तालुक्यात 83, अकोला तालुक्यात 85, बाळापूर तालुक्यात 74, बार्शिटाकळी तालुक्यात 49 व पातूर तालुक्यात 39 असे एकूण 488 मतदान केंद्र निश्चित करण्यात आले आहे.
मतमोजणी बुधवारी (दि.6)
या निवडणूकीत झालेल्या मतदानाची मतमोजणी बुधवार दि. 6 ऑक्टोंबर रोजी सकाळी 10 वाजेपासून सुरु होईल. मतमोजणीची ठिकाणे याप्रमाणे- तेल्हारा येथे नवीन इमारत तहसिल कार्यालय, अकोट येथे कृषि उत्पन्न बाजार समिती कास्तकार भवन, मुर्तिजापूर येथे शासकीय धान्य नवीन गोडाऊन, अकोला येथे शासकीय धान्य गोदाम जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, बाळापूर येथे शासकीय धान्य गोदाम, बार्शीटाकळी येथे पंचायत समिती सभागृह तर पातुर येथे पंचायत समिती सभागृह, पातूर या ठिकाणी मतमोजणी निश्चित करण्यात आली आहे.
निवडणूक प्रक्रियेसाठी २४२८ कर्मचारी तैनात
ही निवडणूक प्रक्रिया राबविण्यासाठी एकुण ४४ झोन तयार करण्यात आले आहेत. ही सर्व निवडणुक प्रक्रिया पार पाडण्यासाठी ६०७ केंद्राध्यक्ष, १८२१ मतदान अधिकारी असे एकूण २४२८ कर्मचारी नेमण्यात आले आहेत. त्याचे प्रशिक्षणही पार पडले आहे. या शिवाय पोलीस बंदोबस्तही सज्ज करण्यात आला आहे. निवडणुक आचारसंहिता अंमलबजावणीसाठी जिल्ह्यात २२ पथके तैनात करण्यात आले आहेत. त्यात तेल्हारा, अकोट, मुर्तिजापूर, अकोला व बाळापूर येथे प्रत्येकी चार तर बार्शी टाकळी व पातुर येथे प्रत्येकी एक पथकांचा समावेश आहे.
प्रतिबंधात्मक आदेश लागू
निवडणुका निर्भय व मुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी निर्गमित केले आहे. त्यानुसार शस्त्र परवानाधारकास शस्त्र वाहून नेण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. तसेच ज्या ठिकाणी मतदान होणार आहे, त्या मतदान केंद्राच्या ठिकाणापासून 200 मीटर परिसरात सर्व पक्षकारांचे मंडप, सर्व दुकाने, मोबाईल फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्वनीक्षेपक, सर्व प्रकारचे फेरीवाले व इतर ईलेक्ट्रॉनिक उपकरणे, निवडणूकीच्या कामाव्यतिरिक्त खाजगी वाहन, संबंधीत पक्षांचे चिन्हांचे प्रदर्शन व निवडणूक कामाव्यतिरिक्त व्यक्तीस प्रवेश करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. तसेच ज्या ठिकाणी निवडणूक साहित्य कक्ष (STRONG ROOM) आहेत, तसेच जिल्ह्यातील मतदान केंद्रावर आणि ज्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे, अशा ठिकाणी 200 मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू राहतील.
क्षेत्रीय अधिकारी कार्यकारी दंडाधिकारी म्हणून घोषीत
निवडणुक विषयक विविध जबाबदारी पार पाडण्याकरीता क्षेत्रीय अधिकारी व सहायक क्षेत्रीय अधिकारी यांना फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम (129)(133)(143)(144) अन्वये जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक कालावधीकरीता कार्यकारी दंडाधिकारी म्हणून अधिकार प्रदान करण्याचे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी निर्गमित केले आहे.
मतदान क्षेत्रात स्थानिक सुटी जाहीर
यानिवडणुकीत मतदारांना आप्ला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी संबंधित मतदान क्षेत्रात स्थानिक सुट्टीचे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी निर्गमित केले आहे. निवडणुक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार, अधिकारी, कर्मचारी, तसेच कामानिमित्त निवडणुक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असलेल्या कामगार, कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मंगळवार दि. 5 ऑक्टोबर रोजी भरपगारी सुट्टी देण्यात आली आहे. तसेच अपवादात्मक परिस्थितीत कामगार,अधिकारी, कर्मचारी इत्यादींना पुर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल अशा मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी कमीत कमी दोन तासांची सवलत देण्यात यावी,असे आवाहन सर्व खाजगी संस्था, व्यापारी संस्था, दुकाने व कारखानदार यांना करण्यात आले आहे.
मद्यविक्री बंद
निवडणुका निर्भय व मुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी जेथे निवडणूका आहेत त्या भागात मतदानाच्या एक दिवस आधी (दि.४), मतदानाच्या दिवशी (दि.५) व मतमोजणीच्या दिवशी (दि.६) रोजी मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिले आहेत. तसेच जेथे मतमोजणी आहे त्या तालुका मुख्यालयी, महापालिका हद्दीत मतमोजणी संपेपर्यंत मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.या आदेशाचा भंग झाल्याचे आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
मंगळवार व बुधवार (दि.5व 6) आठवडी बाजार बंद
ज्या भागात जिल्हा परिषद व पंचायत समिती गणात पोटनिवडणुक होत आहेत तेथे निवडणुका निर्भय व मुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्ह्यातील ज्या गावातील निवडणूक क्षेत्रात मतदानाचे दिवशी मंगळवार दि. 5 ऑक्टोंबर व मतमोजीणीच्या दिवशी बुधवार दि. 6 ऑक्टोंबर रोजी भरणारे आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी निर्गमित केले आहे.
मतदानासाठी ओळखीचे पुरावे
जिल्हा परिषद व पंचायत समिती पोटनिवडणूकीत मतदान करतांना मतदारांना स्वतःची ओळख पटविण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या मतदार ओळखपत्रा व्यतिरिक्त अन्य 17 प्रकारच्या कागदपत्रांची यादी निवडणूक आयोगाने दिली आहे. त्यापैकी कोणतेही एक कागदपत्रे दाखवून मतदार आपली ओळख पटवू शकतात. त्यात पासपोर्ट, वाहन चालविण्याचा परवाना, पॅन कार्ड, केंद्र, राज्य, सार्वजनिक उपक्रम, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कर्मचाऱ्यांना देण्यात आलेले फोटो ओळखपत्र, राष्ट्रीयकृत बॅंक अथवा टपाल पासबुक, स्वातंत्र्य सैनिकांचे ओळखपत्र, सक्षम प्राधिकाऱ्यांने अनु.जाती, अनु. जमाती, इमाव, भटक्या जमाती, वि.मा. प्र इ. ना फोटो सहित दिलेले प्रमाणपत्र, सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला अपंगत्वाचा दाखला, फोटो सहित असलेले मालमत्ता कागदपत्रे, फोटोसहित शस्त्रपरवाना, राष्ट्रीय रोहयो अंतर्गत फोटो ओळखपत्र, निवृत्त कर्मचाऱ्याचे पासबुक, निवृत्त कर्मचारी अवलंबित व्यक्ती यांचे फोटो ओळख पत्र, निवृत्ती वेतनधारक, त्यांच्या विधवा यांचे फोटो ओळखपत्र, आरोग्य विमा योजनेचे फोटो ओळखपत्र, शिधा पत्रिका (कुटुंबातील सर्व सदस्य सोबत आल्यास, एकच व्यक्ती असल्यास वास्तव्याचा अन्य पुरावा), आधार ओळखपत्र, या ओळखपत्रांचा समावेश आहे.