नवी दिल्ली: ऑक्टोबरच्या पहिल्या दिवशीच सर्वसामान्य नागरिकांना महागाईचा झटका बसला आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी सिलिंडर दरात ४३ रुपयांची वाढ केली आहे. यामुळे मुंबईत १९ किलो व्यावसायिक एलपीजी सिलिंडर दर १६८५ रुपयांवर पोहोचला आहे.
१ सप्टेंबर रोजी व्यावसायिक एलपीजी सिलिंडर दरात ७५ रुपयांची वाढ करण्यात आली होती. आता ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच पुन्हा सिलिंडर दरात वाढ करण्यात आली आहे. नवे दर १ ऑक्टोबरपासून लागू करण्यात आले आहेत.
दरम्यान, घरगुती गॅस सिलिंडर दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. व्यावसायिक सिलिंडर दरात वाढ झाल्याने रेस्टॉरंट्स, हॉटेल आणि ढाब्यावरील जेवण महागण्याची शक्यता आहे.
तेल कंपन्यांकडून दर महिन्याला एलपीजी सिलिंडर दराचा आढावा घेतला जातो. प्रत्येक राज्यात वेगवेगळे कर आहेत. त्यानुसार एलपीजी दर प्रत्येक राज्यात वेगवेगळे असतात.
१ ऑक्टोबरपासून मुंबईत १९ किलो वजनाच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडर दरात वाढ झाल्याने तो १६८५ रुपयांवर पोहोचला आहे. तर दिल्लीत हा दर १६९३ रुपयांवरून १७३६.५० रुपयांवर गेला आहे. कोलकात्यात १९ किलो वजनाच्या व्यावसायिक सिलिंडरचा दर १८०५ रुपये इतका आहे. तर चेन्नईत त्याची किंमत १८६७ रुपये आहे.
१४.२ किलो वजनाच्या सिलिंडरचा दर…
दिल्लीत १४.२ किलो वजनाच्या विनाअनुदानित एलपीजी सिलिंडरचा दर ८८४ रुपये एवढा आहे. कोलकातामध्ये त्याचा दर ९११ रुपये तर मुंबईत तो ८८४ रुपयांना उपलब्ध आहे. चेन्नईत त्याची किंमत ९०० रुपये आहे.
सीएनजी-पीएनजीचे दर वाढणार?
केंद्र सरकारने मोठी निर्णय घेत नैसर्गिक वायू दरात ६२ टक्क्यांची वाढ केली आहे. गुरुवारी जारी केलेल्या एका अधिकृत आदेशातून याची माहिती देण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात नैसर्गिक वायू दरात वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्राने हा निर्णय घेतला असल्याचे समजते. सीएनजी, पीएनजीच्या किंमतीतही वाढ होण्याचे संकेत देण्यात आले आहेत.