अमरावती : इयत्ता दहावी मध्ये 90 टक्के पेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या अनुसूचित जाती मधील विद्यार्थ्यांना एमएच-सीइटी, नीट, जेईई या व्यावसायिक उच्च शिक्षणाच्या पूर्वतयारी करीता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजनेअंतर्गत विशेष अर्थसहाय्य देण्यात येत आहे.
या योजनेचा लाभ मार्च 2021 मधील दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना घेता येईल. यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असणे आवश्यक असून कुटूंबातील कोणताही सदस्य शासकीय, निमशासकीय सेवेत कार्यरत नसावा, स्वघोषणापत्र पालकांनी देणे आवश्यक आहे. अर्जासोबत विद्यार्थ्यांच्या पालकांचे जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, दहावीची गुणपत्रिका, रहिवाशी दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, मुख्याध्यापक यांचे शिफारस पत्र इत्यादी कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती सादर करणे अनिवार्य आहे. अर्ज डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांचे पत्यावर रजिस्टर पोस्टाने पाठवावा. या योजनेच्या अटी व शर्ती, निकष व कार्यपध्दती, अर्जाचा नमुना याबाबतची माहिती बार्टीचे संकेतस्थळ https://barti.in/notice-board.php यावर उपलब्ध असल्याची माहीती समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त सुनील वारे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.