World tourism day : गोवा म्हटलं की समुद्र किनारा, रुपेरी वाळू, फेसाळणाऱ्या उंचच उंच लाटा, त्यावर स्वार व्हायचं आणि त्यातून हूळच बाहेर पडायचं आणि बरंच काही… गोव्याला कुणाला जावंस वाटतं नाही. तशी ओढ आमच्या मनातही आजही आहे…
कोल्हापूरपासून गोवा अवघ्या चार ते पाच तासांच्या अंतरावर आहे. कोल्हापूरमध्ये कॉलेज जीवनात प्रत्येक जणांचा ठरलेला प्लॅन म्हणजे गोवा. गोव्याला गेल्याशिवाय कॉलेज जीवन पुर्ण होत नाही असे म्हंटलं तरी वावग ठरणार नाही. घरात सांगायच गणपती पुळ्याला चाललोय आणि गोव्याला जायचं हे प्रत्येकाच्या आयुष्यात घडले असेलच. आमच्या पण आयुष्यात असाच किस्सा घडला होता. पाच टू व्हिलर आणि १० पोरं एका गाडीवर दोघे असा आमचा गोव्याला जाण्याचा प्लॅन ठरला. घरातून निघालो पण तो गोव्यात जाण्याऐवजी मध्येच कसा प्लॅन फसला हे आठवून आम्ही अजुनही हसतो. आज जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने या आठवणींना उजाळा द्यावा वाटला… (World tourism day)
पाच दोन चाकी आणि दहा पोरं. दिवस होता ३ जून २०१८. ठरल्याप्रमाणे सगळे आपल्या गाड्या घेऊन पहाटे ५ ला निघालो. आमच्या दहाजणांमध्ये फक्त दोघांनी गोवा पाहिला होता. यामुळे गोव्यातील ट्रॅफिकचे नियम त्या दोघांनाच माहिती होते. कारण आमच्या ५ वाहनांपैकी फक्त एकाच गाडीची कागदपत्रे क्लिअर होती. त्यामुळे त्या दोघांनी तेरी बी चूप आणि मेरी बी चूप केले आणि आम्ही गोव्याकडे निघालो.
आम्ही गगनबावडामार्गे जात असल्याने करूळ घाटाची वळणे उतरत वैभववाडीतून तारळेमार्गे कणकवलीचा रस्ता धरला होता. पण वाटेत एक असा किस्सा घडला यामुळे गोव्याच्या प्लॅनवर पाणीच फिरले. एका ठिकाणी आम्ही चहासाठी थांबलो होतो; तिथे आमच्यातील एका शहाण्याने चहावाल्याला विचारले गोव्यात जाताना अडवत नाहीत का? चहावाल्याने आमच्यातील सगळ्यानाच भिती घातली आणि गोव्यात जाण्याआधी भितीने निम्मे घाबरले. चहा पिऊन स्टार्टर मारून कणकवलीकडे जात असताना आमच्या दोन गाड्या मागे राहिल्या. हे पाहण्यासाठी आमच्या तीन गाड्या पुन्हा मागे गेल्या तर ट्रॅफिक हवालदारने त्या दोन वाहनांना पकडले होते. त्यांच्यावर तब्बल अडीच हजार रुपयांचा दंड लावला होता. तो आम्ही दिला नाही हा भाग वेगळा पण…
निघतानाच आमची चर्चा रंगली होती की गोव्यात खूप नियम कडक आहेत आणि कागदपत्रे बघतात काय करायचं? कोण सुद्धा विचारत नाही रे भावा असं सांगणारे दोघे होते. सगळ्यांना वाटलं जाऊन आलेत. गोव्यात असेल असचं. पण यांच्या आगाऊ कॉन्फिडन्समुळे आम्हाला कणकवलीतच पहिला दणका बसला होता… एका गाडीची कागदपत्रे व्यवस्थित होती. पण ती गाडी सोडून सगळ्यांना दोन दोनशे असा आठशे रुपयांचा दंड भरावा लागला.
यानंतर सगळे थांबून त्या कॉन्फिडन्सवाल्यांना एकदा विचारात घ्यायचं ठरवत होतो. इथं असं तर मग गोव्यात काय? फक्त दंड भरायला जायचं आहे? एकूण आठशे रुपये घालवल्यावर चर्चेच वादात रुपांतर झालं.
बऱ्यापैकी लोक आता गोवा म्हणजे ट्रिप कमी, कागद दाखवा जास्त होईल या मतावर होते. शेवटी सगळं काही सांगून पण गोवा काय फिक्स होत नव्हताच. एकजण म्हंटला की आपल्या भागात जाऊ कोकणला. यात एकट्याने टोमणा मारला भेटलेले पोलीस म्हणजे देव होते. कारण नंतरचे दंड परवडले नसते या टोमण्यावर आजही हसू थांबत नाही.
आमची ट्रिप मग कोकणात वळली. पण यांची गोव्याची खुमारी जात नव्हती. आम्ही आता कोकण भागात धुवांधार पावसात दिवसभर गाड्या चालवत होतो. आमची वाहने फक्त विश्रांतीसाठीच थांबायची.
कोकणातील आचरा बीच फेमस आहे. आमची मैत्रीण असल्याने त्यांच्या मदतीने एका रिसोर्टवर थांबलो. पहिल्याच दिवशी झालेल्या फजितीची आम्ही चर्चा करत होतो. यावेळी कॉन्फिडन्सवाला म्हणाला अरे गोवा इथून फक्त 75 किमी आहे. बघा अजून विचार करा.
यावर एकट्याने गुगल सर्च मारला तर गोवा तिथून 175 किमी होता. त्याला म्हटलं बाबा गाड्या काय अरबी समुद्रातून नेणार आहेस का?. त्या कॉन्फिडन्सवाल्याची फजिती झाली आणि गोवा ७५ किमी की १७५ किमी यावर आम्ही अजुनही हसतो.
एक वेळ येऊन आम्ही आशा पॉईंट वर पोचलो. जिथून गोवा होऊच शकत नव्हता. ज्या दोघांनी ही बाजू लावून धरली होती त्यातीलच एक म्हणाला की आता गोवा राहू दे घ्या! त्यावर मात्र आम्हाला सुकून मिळाला.
अशा तऱ्हेने ट्रिप तर झाली खास पण फसलेला प्लॅन आजही आठवून दोन दोन तास आम्हाला हसवून जातो. ट्रिप म्हणजे गोवा व्हाया कोकण हेच समीकरण चर्चेत येतं. नंतर मग गोवा केला खरा पण अरबी समुद्रातून फक्त 75 किमीवाला गोवा. त्याला तोड नाही.