पाटणा : बँकेच्या भोंगळ कारभाराचे प्रत्यंतर आपण वेळोवेळी घेत असतो. बँक अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे ग्राहकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. बिहारमध्येही असाच एक प्रकार उघडकीस आलाय. बिहारमध्ये सरकारी अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे दोन विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये कोट्यवधी रुपये जमा झाल्याची घटना समोर आलीय. पाटण्यातील दोन शालेय विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये 960 कोटी रुपये आलेत.
आणखी एक नवीन प्रकार समोर
दोन बँक खात्यांमध्ये 900 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा झालेली पाहिल्यानंतर बँक अधिकारीसुद्धा बुचकळ्यात पडलेत. खगरियामध्ये एका तरुणाच्या बँक खात्यात साडेपाच लाख रुपये जमा झाल्याचे प्रकरण अजून संपलेले नाही, तोपर्यंत आणखी एक नवीन प्रकार समोर आला. ज्या दोन शालेय विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये पैसे जमा झाले. ती दोन्ही मुले आजमनगर पोलीस ठाण्याच्या बाघोरा पंचायतीमध्ये असलेल्या पस्टिया गावातील रहिवासी आहेत. दरम्यान, बिहारमधील शालेय विद्यार्थ्यांना युनिफॉर्मसाठी राज्य सरकारकडून पैसे दिले जातात. हे पैसे थेट मुलांच्या बँक खात्यात जमा होतात. गुरुचंद्र विश्वास आणि असित कुमार हे बँक खात्यातील युनिफॉर्मच्या पैशांची चौकशी करण्यासाठी सीएसपी सेंटरमध्ये गेले होते.
मोदींनी 15 लाख रुपये देण्याची घोषणा केली होती
बँक अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे खात्यातील पैसे तपासण्यासाठी ग्राहक बँक किंवा सीएसपी सेंटर गाठत आहेत. बँका आणि सीएसपी सेंटरबाहेर लांबच लांब रांगा लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतायत. 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 15 लाख रुपये देण्याची घोषणा केली होती. यावरून काही लोक मोदी सरकारवर निशाणा साधत आहेत.
बँक खात्यात करोडो रुपये जमा झालेले ऐकून मुलांना धक्का बसला. विद्यार्थी असित कुमारच्या 1008151030208001 या बँक खात्यात 900 कोटींपेक्षा जास्त रक्कम जमा झाले. तर गुरुचंद्र विश्वास याच्या 1008151030208081 या बँक खात्यामध्ये 60 कोटींपेक्षा रक्कम जमा झाली. दोन्ही खाती उत्तर बिहार ग्रामीण बँक भेलागंज शाखेची आहेत.