अकोला : दि.१५ जिल्ह्यात इयत्ता १२ वी ची परीक्षा गुरुवार दि. १६ सप्टेंबर ते सोमवार दि.११ ऑक्टोबर या कालावधीत आणि इयत्ता दहावीची परीक्षा बुधवार दि.२२ सप्टेंबर ते शुक्रवार दि. ८ ऑक्टोबर या कालावधीत एकूण सात परिक्षा केंद्रावर सुरु होणार आहेत. या परीक्षा शांततेच्या वातावरणात पार पाडण्याकरीता संबंधित परीक्षा केंद्र व त्या बाहेरील १०० मिटर परिसरात फौजदारी प्रक्रिया १९७३ चे कलम १४४ अन्वये प्रतिबंधात्मक आदेश अपर जिल्हादंडाधिकारी संजय खडसे यांनी आज जारी केले आहेत.
या आदेशात म्हटल्यानुसार, परीक्षा कालावधीत (सकाळी आठ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत) परीक्षा केंद्राच्या परिसरात प्रवेश करतेवेळी पाच पेक्षा जास्त व्यक्ती एकत्रितरित्या प्रवेश करणार नाहीत. कोणत्याही प्रकारच्या घोषणा देण्यात येणार नाहीत. परीक्षा केंद्रावर प्रवेश करणाऱ्या सर्व परिक्षार्थी / अधिकारी / कर्मचाऱ्यांचे थर्मल / इफ्रारेट थर्मामिटरद्वारे तापमान तपासण्यात यावे. सर्व पर्यवेक्षकांची रॅपिड ॲन्टिजेन चाचणी करणे अनिवार्य आहे. या कालावधीत परीक्षा केंद्रावरील हवा खेळती राहण्याच्यादृष्टीने सर्व खिडक्या तसेच दरवाजे उघडे ठेवण्यात यावे. सर्व अधिकारी/कर्मचारी तसेच परीक्षार्थी यांना मास्कचा वापर करणे बंधणकारक राहील.
ओळखपत्र असल्याशिवाय व मास्क लावल्याशिवाय परीक्षार्थ्यांना प्रवेश देण्यात येवू नये. प्रत्येक परीक्षार्थी मध्ये किमान तीन फुटाचे अंतर राहील,अशी बैठक व्यवस्था करण्यात यावी. परीक्षा केंद्राच्या प्रवेशद्वारासमोर सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात यावी. परीक्षा केंद्राच्या परिसराची सोडियम हायपोक्लोराईटच्या सहाय्याने निर्जंतुकीकरण करण्यात यावे, कोणत्याही परीक्षार्थी, कर्मचारी, अधिकारी यांना कोविडची लक्षणे दिसून आल्यास तात्काळ नजिकच्या रुग्णालयात दाखल करावे. परीक्षा केंद्र परिसरात शांतता भंग करणारे कोणतेही कृत्य कोणासही करता येणार नाही.
परीक्षा केंद्र परिसराच्या १०० मिटर परिसरात झेरॉक्स सेंटर, फॅक्स मशीन, पानपट्टी, लॅपटॉप, टायपिंग सेंटर, एसटीडी बुथ, ध्वनिक्षेपक इ. माध्यमे परीक्षा संपेपर्यंत बंद ठेव्ण्यात येतील. परीक्षा केंद्रावर कोणत्याही अनधिकृत व्यक्ती व वाहनास प्रवेश मनाई असेल. परीक्षा केंद्रावर काम करणारे कर्मचारी, अधिकारी, बंदोबस्तास असणारे पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना कर्तव्य पार पाडण्यासाठी व परीक्षार्थी यांना प्रतिबंधात्मक आदेश लागू राहणार नाहीत,असे आदेशात म्हटले आहे.