अकोला: दि.८: जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या अतिवृष्टीने १९५ गावांमधील ८६५७ हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधीत झाले असल्याचे प्राथमिक अंदाज आहे.
यासंदर्भात जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार, अकोला तालुक्यात २१ गावांमध्ये १३४७ हेक्टर क्षेत्रावर, मुर्तिजापूर तालुक्यात ३३ गावांमध्ये ४४३ हेक्टर क्षेत्रावरील पिकांना, अकोट तालुक्यात १०२ गावांमध्ये २६४७ हेक्टर क्षेत्रावर, तेल्हारा तालुक्यात २४ गावांमध्ये ३४०० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे असे एकूण १९५ गावांमध्ये ८६५७ हेक्टर क्षेत्रावर पिके बाधीत झाले आहेत. अध्याप पातूर व बार्शीटाकळी या तालुक्यात पिके बाधीत झाल्याची माहिती नाही. बाधीत झालेल्या पिकांत प्रामुख्याने सोयबीन, कापूस, मुग, उडीद, तूर या पिकांचा समावेश आहे, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. अद्याप पंचनामे करण्याचे काम सुरु आहे,असेही प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील पूरस्थिती
अकोला तालुक्यातील सर्व नदी नाल्यांना पूर आला आहे. पूर्णा नदीस आलेल्या पुरामुळे ६०० लोकसंख्या असलेल्या दोनवाडा या गावाचा संपर्क तुटला होता. त्यामुळे गावातील ३० जणांना आपत्ती निवारण कृती दलाच्या जवानांनी सुरक्षित स्थळी हलविले आहे. या लोकांची जवळच म्हातोडी गावातील शाळेत तात्पुरत्या निवाऱ्याची सोय करण्यात आली आहे. याठिकाणी तहसिलदार बळवंत अखराव यांच्या नेतृत्वात नागपुर आपत्ती निवारण कृतीदलाचे उपनिरीक्षक केंद्रे व त्यांचे पथक तसेच तलाठी हरिहर निमकंडे, सुनिल कल्ले आदी उपस्थित होते.
दोघांपैकी एकाचा मृतदेह सापडला
दरम्यान दि.६ रोजी पारडी येथे काटेपूर्णा नदीत गोपाल महादेव कांबे (१९) व सागर गोपालराव कावरे(२१) हे दोघे वाहून गेले. त्यांचे शोधकार्य आपत्ती निवारण कृती दलाच्या जवानांमार्फत सुरु आहे. त्यापैकी गोपाल महादेव कांबे यांच्या मृतदेहाचा शोध लागला आहे. आज दिवसभर हे शोधकार्य सुरु होते. या शोधपथकात सहायक पोलीस निरिक्षक डी.एस. जाधव, बी. आर. गरजे, पी. व्ही. गरजे, एस.ए. जुनगरे यांचा समावेश आहे.
आपत्ती निवारण कृती दलाचे पथक नागपूर येथून आले असून त्यांच्या दोन तुकड्या करण्यात आल्या आहेत. त्यांच्यापैकी एक पथक हे दोनवाडा येथील बचाव कार्यासाठी कार्यरत आहे. दरम्यान गांधीग्राम येथील पूर्णा नदीच्या पुलावरून पाणी वाहन असून अकोला –अकोट रस्ता बंद आहे. तर अकोला- म्हैसांग- दर्यापूर हा मार्ग आज दुपारपासून सुरु झाला आहे.
बार्शी टाकळी तालुक्यातही सर्व नदी नाल्यांना पूर आला आहे तथापि, कोणत्याही गावाचा संपर्क तुटल्याचे वृत्त नाही. तालुक्यातील राजंदा मंडळात ८०.५ मि.मी पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यातील मौजे एरंडा या गावात भिंत कोसळून शामराव अप्पा पवार (७०) या इसमाचा मृत्यू झाला तर गावातील दोन घरांचे पूर्णतः नुकसान झाले आहे.
अकोट तालुक्यातही सर्व नदी नाल्यांना पूर आला असून कोणत्याही गावाचा संपर्क तुटलेला नाही. तालुक्यातील आसेगाव बाजार येथील ७२ घरे, रौदळा येथे ६० तर वरुर येथील एका घरात नाल्याचे पुराचे पाणी जाऊन नुकसान झाले आहे. पंचनामे करण्याचे काम सुरु आहे.
तेल्हारा तालुक्यातही सर्व नदी नाल्यांना पूर आला असून नेर, सांगवी, पिवंदळ या गावांचा संपर्क तुटला आहे.
व्याळा मंडळात ८५ घरांचे नुकसान
बाळापूर तालुक्यात बाळापूर मंडस्ळात ७१.३ मि.मी तर व्याळा मंडळात ७६ मि.मी पावसाची नोंद झाली. शेगाव निंबा अकोट या मार्गावरील अंदुरा येथे पुलावरुन पूर्णा नदीचे पाणी वाहत असल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद आहे. व्याळा मंडळात ८५ घरांचे नुकसान झाले असून पंचनामे करण्याची कार्यवाही सुरु आहे. हाता येथेही काही घरांमध्ये पाणी शिरल्याचे वृत्त आहे.
पातुर तालुक्यातही सर्व नदी नाल्यांना पूर आलेला असून कोणत्याही गावाचा संपर्क तुटल्याचे वृत्त नाही. मुर्तिजापूर तालुक्यात सहा मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. तालुक्यात ३३ घरांचे नुकसान झाले आहे मात्र कोणत्याही गावाचा संपर्क तुटलेला नाही असे कळविण्यात आले आहे.