अकोला : दि.26: सोयाबीन पिकावर मरुका (MARUCA SP) या किडीचा प्रादुर्भाव तेल्हारा तालुक्यातील काही गावामध्ये झाल्याचे दिसून येत आहे. सोयाबीन पिक हिरवेगार मऊ, लुसलुशीत आणि दाट पानांचे असल्यामुळे अनेक किडी या पिकाकडे आकर्षित होतात. त्यात प्रामुख्याने तंबाखूवरील पाने खाणारी अळी किडींचा उद्रेक मोठ्या प्रमाणात दिसून येतो. पिकांच्या सुरुवातीच्या अवस्थेत चक्री भुंगा व खोड माशी या किडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान करतात.
मरुका पॉड बोरर, बिन पॉड बोरर, मुंग माँथ किवा सोयाबीन पॉड बोरर या नावाने ओळखली जाणारी ही किड बहुभक्षी असून प्रामुख्याने तुर या पिकास नुकसान करते. त्याच बरोबर सोयाबीन चवळी, मुंग ,उडीद व पावटा या पिकावर देखील या किडीचा प्रादुर्भाव आढळून येतो.
पिक फुलोरा अवस्था असतांना या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाल्याचे दिसून येते. या किडीचे प्रौढ काळसर रंगाचे असून त्यांच्या पंखांवर पाढरे चट्टे आढळतात. मादी पतंग शक्यतोवर झाडाच्या शेंड्यावर पुंजक्यात अंडी घालते. किडीची अळी हिरवट पांढऱ्या रंगाची चमकदार असून तिच्या पाठीवर काळसर ठिपके असतात. म्हणून तिला ठिपक्याची अळी म्हणतात. या किडीचा जीवनक्रम साधारनपणे 18 ते 35 दिवसात पूर्ण होतो. प्रथम अवस्थेतील अळ्या प्रामुख्याने फुले व फुलकळ्यावर उपजीविका करतात तिसऱ्या व पाचव्या अवस्थेतील अळ्या मोठ्या प्रमाणात शेंगांना प्रादुर्भाव करतात. विशेषतः आँगस्ट, सप्टेबर महिन्यात जास्त आद्रता असलेल्या भागात या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसून येते.
सद्या परिस्थितीत सोयाबीन वरील मरुका किडीच्या नियंत्रणासाठी केंद्रीय कीटकनाशक मंडळाद्वारा कुठल्याही कीटकनाशकाची शिफारस उपलब्ध नाही. परंतु तुरीवरील मरुका किडीच्या नियंत्रणासाठी क्लोरँट्रनिलीप्रोल 18.50एस.सी. चे तीन मि.ली., इथिआँन 50 ई.सी. चे 20 मि.ली., फ्लुबेन्डामाईड 20 डब्लु. जि. सहा ग्राम, थायोडीकार्ब 75 डब्लु. पी. 15 ग्रम, इंन्डोक्झास्कार्ब 15.80 ई. सी. सहा ग्रम, इंन्डोक्झास्कार्ब 14.50 एस. सी. चार मि.ली., नोव्हँल्युराँन 5.25 + इंन्डोक्झास्कार्ब 4.50 एस. सी. 17.5 मि.ली. प्रमाणे 10 लिटर पाण्यामध्ये दिलेल्या प्रमाणानुसार कीटकनाशकाचा वापर करुन फवारणी करावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कांतप्पा खोत यानी केले.