अकोला- शासनाच्या अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत विविध अन्न व औषध क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना परवाने दिले जातात. हे परवाने देण्यासाठी आता शासनाने ऑनलाईन प्रणाली विकसीत केली असून त्या ऑनलाईन प्रणालीवरुन हे परवाने देण्याबाबत सेतू केंद्रचालकांचे आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृहात प्रशिक्षण घेण्यात आले. यावेळी सहायक आयुक्त औषधे वि.द. सुलोचने, सहायक आयुक्त अन्न सागर तेरकर, अन्न निरीक्षक आर.एस. वाकडे, औषधे निरीक्षक राठोड, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधीक्षक मीरा पागोरे आदी उपस्थित होते. यावेळी जिल्ह्यातील सेतू केंद्र चालक सहभागी झाले होते. त्यांना अन्न विभाग व औषधे विभाग त्या विभागांशी निगडीत उद्योग व त्यांच्याबाबत भरावयाची माहिती, विविध प्रमाणपत्रे, कागदपत्रे यांचे अपलोडींग, शुल्क अदायगी आदींबाबत माहिती सांगण्यात आली. त्याबाबत प्रत्यक्ष सादरीकरण करण्यात आले. या प्रक्रियेमुळे कोणत्याही अन्न व औषधांच्या संदर्भातील उद्योग, व्यवसायांचे नोंदणी करणे, नुतनीकरण करणे हे सोपे व ऑनलाईन पद्धतीने होणार असल्याचे प्रतिपादनही वि. द. सुलोचने यांनी केले.