मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असलेल्या 25 जिल्ह्यांतील शाळा (school) येत्या 17 ऑगस्टपासून सुरू होणार आहेत. यासंदर्भात शालेय शिक्षण विभागाची बैठक होणार असून या बैठकीत अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.
गेल्या मार्च 2020 पासून राज्यातील शाळा (school) कोरोनामुळे बंद आहेत. विद्यार्थ्यांना ऑनलाईन माध्यमातून शिक्षण दिले जात आहे. आता लवकरच शाळा सुरू करण्याच्या हालचाली शालेय शिक्षण विभागाने सुरू केल्या आहेत.
गेल्या एक ऑगस्टला ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत जारी झालेल्या नियमावलीत शाळा (school) सुरू करण्याचा निर्णय घेण्याचे अधिकार राज्य सरकारला आहेत. यासंदर्भात आढावा घेण्यासाठी शिक्षण विभागाची पुढील आठवड्यात बैठक होणार आहे.
सद्य:स्थितीत आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू आहेत. राज्याच्या 25 जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्यामुळे येथील शाळा सुरू करण्याबाबत शालेय शिक्षण विभागाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे गुरुवारी फाईल पाठवली आहे.
सद्य:स्थितीत आठवी ते बारावीच्या राज्यभरात 36 हजार 835 शाळा आहेत. या शाळांत 86 लाख 33 हजार 805 विद्यार्थी आहेत.
त्यापैकी केवळ जुलैअखेर आलेल्या आकडेवारीत केवळ 9 लाख विद्यार्थी शाळेत दाखल झाले असल्याचे दिसून आले आहे.
एकूण विद्यार्थ्यांपैकी शाळेत येणार्या विद्यार्थ्यांचे प्रमाण केवळ 10.41 टक्के असल्याचे दिसून आले.
यासाठी ग्राम पातळीवरही अधिकार देत आठवी ते बारावीच्या शाळा राज्यभरात सुरू आहेत.
मात्र याला कमी प्रतिसाद मिळाल्याचे दिसत आहे.
बहुतांश ग्रामपंचायतींनी परवानगी न दिल्याने शाळाच बंद असल्याचे दिसून येत आहे.
नागपूर आणि अमरावती विभाग वगळता फारसा प्रतिसाद मिळाला नाही.
पुणे आणि मुंबई विभागात शाळा फारशा उघडल्याच नाहीत.
या पार्श्वभूमीवर माध्यमिक सोबत प्राथमिक वर्ग सुरू करण्याच्या पार्श्वभूमीवर बुधवारी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा केली.
85 टक्के पालकांची मागणी
अन्य वर्गांच्या शाळा सुरू करण्यासाठी शिक्षण विभागाने एमसीईआरटीमार्फत केलेल्या सर्वेक्षणात शाळा सुरू करण्याबाबत पालकांची सकारात्मक भूमिका दिसून आली.
नववी, दहावीतील विद्यार्थ्यांच्या पालकांनी सर्वाधिक सहभाग नोंदवला.
त्याखालोखाल सहावी ते आठवीतील विद्यार्थ्यांच्या पालकांनी सहभाग नोंदवला आहे.
शहरी भागातील शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांचा अधिक समावेश होता.
यात सुमारे 85 टक्के पालकांनी शाळा सुरू करण्याची मागणी केली आहे.
अन्य वर्गही सुरू करण्यासंदर्भात पालकांकडून होत असलेल्या मागणीमुळे शाळा सुरू करण्याची गरज असल्याचे शालेय शिक्षण विभागाचे म्हणणे आहे.
15 टक्के फी कमी करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांकडे…
खासगी शाळांची फी 15 टक्के कमी करण्याचा निर्णय झाला.
तरी मुख्यमंत्र्यांकडून आदेश आल्यावर त्याची अंमलबजावणी होईल, असेही मंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक पालकांना नोकर्या गमवाव्या लागल्या आहेत.
पगार कपातीचाही अनेकांना फटका बसल्याने विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक शुल्क कमी घेण्याबाबत शासनाने सर्व शिक्षण संस्थांना आदेश द्यावेत, अशी विनंतीही शिक्षण विभागाने केली आहे.