टोकियो – टोकियो ऑलिम्पिकमध्ये कुस्तीच्या लढतींना सुरुवात झाल्यापासून भारतीय कुस्तीपटूंचा दबदबा दिसून येऊ लागला आहे. आज झालेल्या फ्रीस्टाईल कुस्तीच्या लढतींमध्ये रवी कुमार दहिया आणि दीपक पुनिया या भारतीय कुस्तीपटूंनी जोरदार खेळ करत उपांत्य फेरीत धडक मारली आहे.
कुस्तीमध्ये पुरुषांच्या ५७ किलो वजनी गटात भारताच्या रवी कुमार दहियाने जबरदस्त कामगिरी केली. बल्गेरियाच्या व्हेलेंटिनोव्हविरोधात झालेल्या या लढतीत रवी कुमार दहियाने सुरुवातीपासून वर्चस्व राखले. अखेर या लढतीत १४-४ अशी आघाडी घेत टेक्निकल सुपियॉरिटीच्या जोरावर विजय मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. तत्पूर्वी रवी कुमार दहियाने उपउपांत्यपूर्व लढतीत कोलंबियाच्या ओस्करचा १३-२ असा धुव्वा उडवला होता.
तर पुरुषांच्या ८६ किलो फ्रीस्टाईल कुस्तीच्या गटात भारताच्या दीपक पुनियाने देशासाठी जबरदस्त कामगिरी करत देशासाठी पदकाची आस जागवली. भारताचा दीपक पुनिया आणि चीनचा शेन यांच्यातील ही लढत रोमहर्षक झाली. या लढतीत दीपक पुनियाने सुरुवातीला आघाडी घेतली होती. मात्र खेळाच्या मध्यावर चिनी कुस्तीपटूने जोरदार मुसंडी मारत ३-३ अशी बरोबरी साधली. मात्र सामना संपण्यासाठी काही सेकंदांचा वेळ असताना दीपकने निर्णायक डाव खेळत २ गुण कमावले आणि विजय निश्चित केला.
आता उपांत्य लढतीत रवी कुमार दहियाचा सामना कझाकिस्तानच्या नुरिस्लामशी होणार आहे. तर दीपक पुनियाचा सामना अमेरिकन कुस्तीपटूसोबत होणार आहे.
नीरज चोप्राची जबरदस्त कामगिरी, अव्वलस्थानासह गाठली भालाफेकीची अंतिम फेरी
टोकियोमध्ये आजच्या दिवसाची सुरुवात भारतासाठी दणक्यात झाली आहे. आज सकाळी झालेल्या पुरुषांच्या भालाफेकीमध्ये भारताच्या नीरज चोप्रा याने जबरदस्त कामगिरी करत दिमाखात अंतिम फेरी गाठली. अ गटात समावेश असलेल्या नीरजने पहिल्याच प्रयत्नात तब्बल ८६.६५ मीटर भालाफेक करत अंतिम फेरीचे तिकीट पक्के केले. मात्र भालाफेकीच्या पात्रता फेरीत ब गटात समावेश असलेल्या भारताच्या शिवपाल सिंह याला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. त्याची सर्वोत्तम भालाफेक ७६.४० मीटर राहिली, जी अंतिम फेरीसाठी पात्र ठरण्याच्या निकषापेक्षा खूप कमी होती.
दरम्यान, पुरुषांच्या भालाफेकीमध्ये भारताचा युवा खेळाडू नीरज चोप्राचाच बोलबाला राहिला. नीरज चोप्रा ८६.६५ मीटर भालाफेकीसह अव्वलस्थानी राहिला. अ आणि ब गटातील कुठल्याही खेळाडूला त्याच्या कामगिरीची बरोबरी करता आली नाही. पात्रता फेरीत ८५.६४ मीटर अंतरासह जर्मनीचा वेटर जॉन्सन दुसऱ्या स्थानी राहिला. तर पाकिस्तानचा नदीम अर्शद ८५.१६ मीटर भालाफेकीसह तिसऱ्या स्थानी राहिला.
आघाडीच्या या तीन भालाफेकपटूंसह ब गटातून चेक प्रजासत्ताकचा जाकूब (८४.९३ मीटर), जर्मनीचा वेबर ज्युलिएन (८४.४१) तर अ गटातून फिनलंडचा इटालानियो लासी (८४.५० मीटर) भालाफेकीसह पात्रतेचा निकष पार करत अंतिम फेरीसाठी पात्र ठरले. दरम्यान, भारताची भालाफेकपटू अनुराणी ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरू शकली नाही. मंगळवारी ५४.०४ मीटर फेक करीत अनू अ गटात १४ व्या स्थानी राहिली.१४ खेळाडूंमध्ये अनूने ५०.३५ मीटरसह सुरुवात केली. दुसऱ्या प्रयत्नांत ५३.१९ मीटरचे अंतर गाठले.