अकोला- कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेचा मुकाबला करुन आरोग्य यंत्रणेतील सर्व कर्मचाऱ्यांनी सक्षमपणे परिस्थिती हाताळली. आज दुसऱ्या लाटेमुळे निर्माण संसर्गाची स्थिती आपण नियंत्रणात आणू शकलो आहोत ते केवळ आरोग्य कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे. असे असले तरी आता आपल्याला तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी सज्जता करतांना ती प्राथमिक आरोग्य केंद्र सक्षम करणे हे उद्दिष्ट ठेवून करायची आहे, अशा शब्दात आज जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.
जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त आरोग्य विभागाच्या वतीने जिल्हा स्त्री रुग्णालयात आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सत्कार कार्यक्रमात जिल्हाधिकारी पापळकर बोलत होते. कोविड काळातही शासनाच्या कुटूंब कल्याण योजनांची अंमलबजावणी करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना यावेळी जिल्हाधिकारी व अन्य मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तसेच कोविड योद्धे म्हणून सेवा बजावणाऱ्या आरोग्य कर्मचारी अधिकारी यांनाही गौरविण्यात आले.
जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या कस्तुरबा सभागृहात पार पडलेल्या कार्यक्रमास जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा पतिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुरेश आसोले, उपअधिष्ठाता डॉ.कुसुमाकर घोरपडे, डॉ.श्याम शिरसाम, डॉ.आरती कुलवाल, डॉ.दिनेश नैताम, डॉ.संगीता साने, डॉ.पटोकार आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुरेश आसोले यांनी केले. त्यात त्यांनी जागतिक लोकसंख्या दिनाचे महत्त्व व त्याअनुषंगाने कुटुंब कल्याण योजनांच्या अंमलबजावणीचे महत्त्व विषद केले.
आपल्या भाषणात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांनी सांगितले की, कुटुंब कल्याण कार्यक्रम राबवितांना ग्रामीण स्तरावर समुपदेशन अधिक महत्त्वाचे असून त्यासाठी शासनाचे आरोग्य कर्मचारी हे महत्त्वाची भूमिका बजावतात.
जिल्हाधिकारी पापळकर म्हणाले की, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपासून प्राथमिक आरोग्य स्तरावरील यंत्रणा सक्षम करणे हे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनाने ठरवले आहे. त्यादृष्टीने काम सुरु झाले आहे. कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्य्या लाटेत फार मोठं काम आरोग्य कर्मचाऱ्यांनी केलं, त्यांनी सक्षमपणे काम केलं म्हणून कोविडचा मुकाबला करता आला. आता स्थिती सुधारत असली तरी उसंत न घेता तिसऱ्या लाटे साठी सज्जता करावी लागेल. प्रशासनाने त्यासाठीची पूर्व तयारी सुरू केली आहे. या पूर्वतयारीचा भाग म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर सज्जता करण्यात येत आहे. ग्रामिण भागातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी ही सज्जता करतांनाच कोविड लसीकरण अधिकाधिक लोकांचे करून घ्यावे,असे आवाहनही त्यांनी केले.
या कार्यक्रमात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा रुग्णालय, जिल्हा स्त्री रुग्णालय तसेच सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांपैकी निवडक कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात आले. कोविड निर्बंधांमुळे जादा व्यक्तिंना पाचारण करण्यात आले नव्हते. त्यासाठी आता प्रत्येक तालुका व आरोग्य केंद्र स्तरावरही कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात येणार आहे,असे संयोजकांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रकाश गवळी, सूत्रसंचालन सचिन उनवणे यांनी केले.