राज्यातील कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अमरावती, अकोला, वाशिम, गडचिरोली आणि उस्मानाबाद आणि बुलडाणा हे 15 जिल्हे रेड झोनमध्ये आहेत.
कोरोनाबाधितांची संख्या आणि मृत्यू दर या निकषांवर या जिल्ह्यांना रेड झोनमध्ये वर्गीकृत करण्यात आले आहे. या जिल्ह्यांत एक जूननंतरही कडक लॉकडाऊन राहणार आहे. त्याचवेळी उर्वरित जिल्ह्यात लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने शिथिल केला जाणार असल्याचे संकेत आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सोमवारी दिले.
राज्यव्यापी लॉकडाऊनची मुदत 1 जून रोजी सकाळी संपत असल्याने त्याबाबत येत्या पाच-सहा दिवसांत जिल्ह्यांचा आढावा घेऊन लॉकडाऊनबाबत निर्णय घेतले जातील. ज्या जिल्ह्यात रुग्णसंख्येत घट झाली आहे, त्या जिल्ह्यांना लॉकडाऊनमधून सवलत देण्याचा विचार आहे, असेही ते म्हणाले.
कोरोनाच्या दुसर्या लाटेमुळे राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. या लॉकडाऊनची मुदत 1 जूनला सकाळी 7 वाजता संपत आहे. गेला दीड महिना लॉकडाऊन असून आता लॉकडाऊन शिथिल करण्याची मागणी होत आहे. त्यामुळे ज्या भागात रुग्णसंख्या घटली आहे, त्या ठिकाणी ‘मिशन बिगिन अगेन’अंतर्गत व्यवहार सुरू करण्याच्या हालचाली राज्य सरकारने सुरू केल्या आहेत.
1 जूनपासून काही जिल्ह्यांना लॉकडाऊनमधून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. काही जिल्हे अजूनही रेड झोनमध्ये असल्याने अशा जिल्ह्यांमध्ये शिथिलता आणता येणार नाही, असे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. मात्र ज्या ठिकाणी रुग्णसंख्या कमी आहे, तेथे लॉकडाऊन शिथिल करण्यावर विचार सुरू असल्याचे ते म्हणाले.
रेड झोनमधील जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा एका आठवड्यात आढावा घेऊन जिल्हानिहाय त्याबाबत निर्णय घेतले जातील. रेड झोनमधील जिल्ह्यात रुग्णसंख्या कमी झाली नाही तर कडक लॉकडाऊन कायम ठेवण्याशिवाय पर्याय नाही, असेही त्यांनी सांगितले.
रुग्णसंख्या वाढत असणार्या जिल्ह्यात कोरोनाबाधितांना घरी क्वारंटाईन करण्याची सुविधा रद्द करण्यात आली आहे. तेथे कोव्हिड सेंटर किंवा संस्थेमध्येच क्वारंटाईन केले जाणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.मुंबईतील रुग्णसंख्या कमी होत असली तरी लोकल पुढील 15 दिवस सर्व प्रवाशांसाठी खुली करता येणार नाही, असे ते म्हणाले.
आता धोका यलो फंगसचा
कोरोनाचे संकट असताना त्यात ब्लॅक फंगसचा आजार विळखा घालत आहे. त्यापाठोपाठ व्हाईट फंगसचा संसर्ग सुरू झाला. आता यलो फंगसचे नवे संकट येऊ पाहत आहे. उत्तर प्रदेशात यलो फंगसचा पहिला रुग्ण सापडला आहे. ब्लॅक फंगस आणि व्हाईट फंगसपेक्षा यलो फंगस अधिक धोकादायक असल्याने तज्ज्ञांनी सावध राहण्यास सांगितले आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.