नागपूर : कोरोना चाचणी करण्यासाठी RT-PCR किंवा रॅपिड एन्टिजेन टेस्टचा वापर केला जातो. पण नागपूरच्या ‘निरी’ अर्थात राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन केंद्रानं (National Environmental Engineering Research Institute) नवीन पर्याय शोधून काढलाय. या संशोधनानुसार तुमच्या थुंकीद्वारे कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. त्यामुळे आता कोरोना चाचणी करण्यासाठी नाकातून किंवा तोंडातून स्वॅब घेण्याची गरज लागणार नाही. महत्वाची बाब म्हणजे निरीच्या या संशोधनाला ICMR ने ही मान्यता दिली आहे. कोरोना चाचणीच्या या पद्धतीमुळे वेळ आणि खर्चाचीही बचत होणार आहे. (Corona will be tested by spitting, ICMR accreditation of research from NEERI)
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारनं कोरोना चाचण्यांचं प्रमाण वाढवलं आहे. त्यामुळे RT-PCR चाचण्यांचा रिपोर्ट येण्यास 3 ते 4 दिवसांचा कालावधी लागत आहे. अशावेळी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यास रुग्णांना उपचार घेण्यास उशीर होत आहे. अनेक रुग्णांचा वेळेत उपचार न मिळाल्याने जीवही गेलाय. यावर पर्याय म्हणून नागपूरच्या ‘निरी’ संस्थेने नवीन पर्याय शोधून काढलाय. सलाईनमध्ये वापरलं जाणारं ग्लुकोज तोंडात घेऊन त्याची गुळणी करून ती थुंकी एका बाटलीमध्ये घेतली जाते. त्या थुंकीचा वापर आरटीपीसीआर टेस्ट साठी केला जातो.
कोरोना चाचणी सुलभ आणि सुकर होण्यास मदत
निरी संस्थेनं दिलेल्या या पर्यायामुळे वेळ आणि खर्चाची बचत होणार आहे. कारण 3 तासात कोरोना चाचणीचा अहवाल मिळू शकणार आहे. तसंच नाकातून किंवा तोंडातून स्वॅब घेण्यासाठी लागणाऱ्या किटचीही गरज भासणार नाही. ICMR ने या पद्धतीला मान्यता दिलीय. सुरुवातीला देशभरातील पाचशे लॅबमध्ये या पद्धतीचा वापर केला जाणार आहे. या पद्धतीमध्ये चाचणीसाठी लोकांना रांगेत लागण्याची गरज नाही. शिवाय वेळही वाचेल आणि संसर्ग होण्याचाही धोका कमी होईल. त्यामुळं लवकरात लवकर ही पद्धत अंमलात आणल्यास चाचण्या सुलभ आणि सुकर होण्यास मदत होईल, असं या संस्थेकडून सांगण्यात येत आहे.
@ICMRDELHI has approved for the use of Saline Gargle RT-PCR test *developed by CSIR-NEERI* for #COVID19detection and advised NEERI to train other COVID-19 testing labs. @CSIR_IND @drharshvardhan @shekhar_mande @kvijayraghavan @GVRayasam @doctorsoumya @RenuSwarup @CsirEvc
— CSIR-NEERI (@CSIR_NEERI) May 19, 2021
कोरोनामुक्तीनंतर 3 महिन्यांनी लस
कोरोनामुक्त झाल्यानंतर आता तुम्ही 3 महिन्यांनी लस टोचून घेऊ शकणार आहात. कारण NEGVAC अर्थात (National Expert Group on Vaccine Administration for COVID-19)ने दिलेल्या सूचनांना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. NEGVAC ने केलेल्या सूचनांमध्ये एखादा व्यक्ती कोरोनामुक्त झाल्यावर त्याला 3 महिन्यांनी कोरोना लस द्यावी असं सांगण्यात आलं होतं. त्यांची ही सूचना आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने अमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे.
लसीकरणाबाबत NEGVACच्या 4 सूचनांना मंजुरी
1. कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तीला 3 महिन्यानंतर कोरोना लस दिली जाऊ शकते
2. कोरोना लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर कोरोनाचा संसर्ग झाला असेल तर कोरोनातून बरे झाल्यानंतर 3 महिन्यांना दुसरा डोस घ्यावा.
3. आपल्या बाळांना स्तनपान करणाऱ्या माताही कोरोना लस घेऊ शकतात.
4. कोरोना लस घेण्यापूर्वी रॅपिड एन्टिजेन टेस्ट करण्याची गरज नाही.