राज्यात कोरोनातून बरे झालेल्या काही रुग्णांपुढे म्युकर मायकॉसिस या बुरशीजन्य संसर्गाचे (फंगल इन्फेक्शन) नवे संकट उभे राहत आहे. या आजारावरील उपचारासाठी महागड्या औषधांचा आधार घ्यावा लागत असून संबंधित औषधांचा साठाही बाजारातून संपल्यामुळे गंभीर आजाराशी एक झुंज देऊन मृत्यूच्या जबड्यातून बाहेर पडलेल्या रुग्णांवर नवी झुंज देण्याची वेळ येऊन ठेपली आहे.
या आजारावर उपयुक्त ठरणार्या औषधांचा मुबलक साठा वेळीच उपलब्ध केला नाही, तर रुग्णांच्या नातेवाईकांना औषधासाठी रेमडेसिवीरसारखी धावपळ नशिबी येऊ शकते. कोरोनावरील उपचार पद्धतीत वापरण्यात येणार्या उत्प्रेरके (स्टेरॉईडस्), रेमडेसिवीर औषधांचे रुग्णांवर दुष्परिणामही जाणवत आहेत. यामध्ये फुप्फुसाचे स्नायू कठीण होणे (लंग्ज् फायब्रॉसिस) हा आजार निदर्शनास आला होता.
आता त्यापाठोपाठ म्युकर मायकॉसिस या बुरशीजन्य आजाराने डोके वर काढले आहे. या आजारावर अॅम्फोटेरेसिन या बुरशीविरोधी (अँटी फंगल) औषधाची मात्रा आजाराची तीव्रता आणि रुग्णाचे वजन विचारात घेऊन दिली जाते. एका रुग्णाला सरासरी 50 मि. ग्रॅ. क्षमतेच्या किमान 50 ते 60 इंजेक्शनच्या कुप्या देण्यात येतात. एका कुपीची किंमत 2 हजार ते 8 हजार रुपये आहे. याचाच अर्थ एका रुग्णाला या आजारातून सुटका करून घेण्यासाठी किमान 1 ते 4 लाख रुपये केवळ औषधांवर खर्च करावे लागतात. हा खर्च रेमडेसिवीर, टोसिलझुमॅब या औषधांच्या खर्चापेक्षा कितीतरी पटीने अधिक आहे. सर्वसामान्यांना न पेलवणारा खर्च आणि बाजारातील औषधांची टंचाई लक्षात घेता शासन स्तरावर या औषधांच्या साठ्यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक बनले आहे. मधुमेहग्रस्त कोरोना रुग्णांना हा आजार होत असल्याचे निरीक्षण आहे. असे रुग्ण कोरोनामुक्त झाल्यावर त्यांच्या नाकाच्या पोकळ्यांमध्ये (पॅरानेझल सायनसेस)हा बुरशीजन्य आजार जमा होतो. तेथून तो डोळे, मेंदू या अवयवांमध्येही पसरतो.
अशा आजार झालेल्या रुग्णांच्या चेहर्यावर सूज येणे, डोळे सुजणे, दृष्टी अंधूक होणे, तीव्र डोकेदुखी, दात ठिसूळ होणे अशी लक्षणे दिसतात. नाकाचा सीटी स्कॅन काढला, की आजारावर तत्काळ शिक्कामोर्तब करणे सोपे होते. अशी लक्षणे आढळल्यास रुग्णांनी तत्काळ उपचार करून घेणे आवश्यक आहे. भारतामध्ये अॅबॉट इंडिया, सन फार्मा, भारत सिरम, मायलान, सिप्ला, इन्टास फार्मा, सेलॉन, कॅडिला फार्मा आदी कंपन्या अॅम्फोटेरेसिन बनवतात. त्यांच्या उत्पादनांच्या किमती निरनिराळ्या आहेत. केंद्र सरकारने किंमत नियंत्रणाखाली आणली, तरी त्याचे अनेक प्रकार बाजारामध्ये उपलब्ध आहेत.