नागपूर : मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील हरीसाल येथे वनपरिक्षेत्र अधिकारी पदावर दबंग कामगिरी बजावत असलेल्या दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणातील आरोपी निलंबित मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डीला अखेर अटक करण्यात आली आहे. अमरावती ग्रामीण पोलिसांनी नागपूर गुन्हे शाखेच्या मदतीने नागपुरात ही कारवाई केली आहे.
दीपाली चव्हाण आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यापासून श्रीनिवास रेड्डी हे अटक टाळण्यासाठी लपून छपून फिरत होते. काल (28 एप्रिल) रेड्डी यांचे लोकेशन नागपुरात असल्याची माहिती अमरावती पोलिसांना मिळाली होती. यानंतर पोलिसांची एक टीम नागपुरात दाखल आहे. यानंतर पोलिसांनी नागपूर गुन्हे शाखा आणि स्थानिक सायबर सेलच्या मदतीने रेड्डीची शोधाशोध सुरू केली. या शोधमोहिमेत पोलिसांना यश आलं असून त्यांनी श्रीनिवास रेड्डीला अटक केली आहे.
वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडून आत्महत्या केली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी शिवकुमार याला याआधीच पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात तक्रार करूनही कारवाईस टाळाटाळ केल्याप्रकरणी रेड्डी याच्यावरही गुन्हा दाखल झाला होता. वनविभागाने रेड्डी याला निलंबित केले होते. अमरावती ग्रामीण पोलिसांनी दीपाली चव्हाणच्या आत्महत्येला कारणीभूत असल्याच्या आरोपाखाली रेड्डीवरसुद्धा गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून रेड्डी अटक टाळण्यासाठी लपला होता. अमरावती पोलीस त्याचा जागोजागी शोध घेत होते. बुधवारी दुपारपासून त्यांचे लोकेशन नागपुरात दिसत असल्यामुळे अमरावती ग्रामीण पोलिसांची टीम नागपुरात दाखल झाली. त्यांनी गुन्हे शाखा तसेच स्थानिक सायबर सेलच्या मदतीने रेड्डीचा शोध घेतला.
दीपाली चव्हाण यांच्या सुसाईड नोटमध्ये रेड्डी वर गंभीर आरोप
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे अपर मुख्य प्रधान सरंक्षक रेड्डी यांच्या नावे लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये दीपाली चव्हाण यांनी काही गंभीर आरोप केले आहेत. त्यात खालील आरोपांचा समावेश आहे.
ऑक्टोबर २०२०मध्ये आपण आमझरी दौऱ्यावर असताना प्रेग्नंसीमुळे मी ट्रेक करु शकत नव्हते. याबाबत मी पियूषा मॅडमला सांगितले आणि घरी निघून गेले. पण यानंतर सलग तीन दिवस मला भाकूरमध्ये कच्च्या रस्त्यातून फिरवण्यात आले. त्यामुळे माझा गर्भपात झाला. पण त्यातसुद्धा मला सुट्टी दिली नाही. माझे सासर अमरावतीत आहे. पण महिन्यातून एकदाही मला घरी जाता येत नाही.
रात्री बेरात्री कुठेही भेटायला बोलवतात. अश्लील भाषेत बोलतात. मी याआधीही तुमच्याकडे तक्रार केली होती. पण तुम्ही तुमच्या अधिकाऱ्याची बाजू घेणार हे मला माहिती होती. त्यामुळे मी माझ्याच बदलीचा विचार करत होते. मेळघाट ही अशी दलदल आहे जिथे आम्ही आमच्या मर्जीने येऊ तर शकतो पण तुमच्या मर्जीशिवाय बाहेर जाऊ शक नाही. याच दलदलीत मी अडकत चालले आहे.
माझ्या रेंजमधील सर्व काम करुनही मला अद्याप याचे पैसे मिळाले नाहीत. मी मेडिकलवरुन कामावर रुजू होत नव्हते पण तुमच्यामुळे रुजू झाले. त्यावेळी तुम्ही त्यांच्याशी बोलाल असे आश्वासन दिले होते. पण त्यांच्या वागण्यात काहीही बदल झाला नाही. उलट दिवसेंदिवस त्यांचा माझ्यावरचा राग वाढत चालला असल्याचे दीपाली चव्हाण यांनी पत्रात म्हटले होते