वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे देश मोठ्या संकटात आहे. येत्या काही दिवसांत हे संकट अधिक गडद होण्याची शक्यता आहे. भारतातील कोरोना मृतांचा आकडा मे च्या मध्यावधीपर्यंत ५,६०० वर पोहोचू शकतो, असा इशारा अमेरिकेतील एका अभ्यास अहवालातून देण्यात आला आहे. याचा अर्थ असा होतो की केवळ एप्रिल ते ऑगस्ट दरम्यान देशात कोरोनामुळे सुमारे तीन लाख लोक आपला जीव गमावू शकतात.
वॉशिंग्टन विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक्स अॅण्ड इव्हॅल्युशनने (आयएचएमई) ‘कोव्हिड प्रोजेक्शन्स’ या नावाने तयार केलेल्या अभ्यास अहवालातून भारतात कोरोना मृतांचा आकडा मोठ्या संख्येने वाढणार असल्याचा इशारा दिला आहे. हा अहवाल भारतासाठी चिंता वाढवणारा आहे. हा अहवाल नुकताच प्रसिद्ध करण्यात आला आहे.
कोरोनामुळे देशातील आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे. औषधे आणि ऑक्सिजनअभावी अनेक रुग्णांना जीव गमवावा लागत आहे. पुढील काही आठवड्यात भारतातील कोरोनाची परिस्थिती अत्यंत वाईट होणार असल्याचे संकेत अहवालातून देण्यात आले आहेत.
पुढील महिन्यात १० मे रोजी कोरोना मृतांची भारतातील रोजची संख्या ५,६०० वर जाईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. कोरोनामुळे १२ एप्रिल ते १ ऑगस्ट दरम्यान देशात ३ लाख २९ हजार जणांचा मृत्यू होऊ शकतो. तसेच जुलै अखेरपर्यंत मृतांचा आकडा ६ लाख ६५ हजारपर्यंत वाढू शकतो, असाही अंदाज आयएचएमईने व्यक्त केला आहे.
दरम्यान, गेल्या २४ तासांत कोरोनाचे नवे ३ लाख ३६ हजार ७८६ रुग्ण आढळून आले आहेत. तर तब्बल २,६२४ जणांचा मृत्यू झाला आहे.