मुंबई : कोरोना प्रादुर्भावाच्या काळात आपल्या फुप्फुसांचे कार्य व्यवस्थित सुरू आहे का? आणि शरीरात ऑक्सिजनची पातळी किती आहे हे कोरोना रुग्णांना, नागरिकांना आता घरच्या घरी तपासता येणार आहे. यासाठी घरातल्या घरात सहा मिनिटे चालण्याची चाचणी (सिक्स मिनिट वॉक टेस्ट) करण्याचा सल्ला आरोग्य विभागाने दिला आहे. कोरोनाची कोणतेही लक्षणे नसलेल्या रुग्णांनी सहा मिनिटे चालण्याची चाचणी करावी व त्याबाबत जिल्हा आरोग्य यंत्रणेने नागरिकांत जनजागृती निर्माण करावी, असे आवाहन राज्याचे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी केले आहे.
राज्यात सध्या सात लाखांच्या घरात सक्रिय रुग्ण आहेत. मात्र, यातील 60 ते 70 टक्के लोकांना कोणतेही विशेष लक्षणे नसल्याने रुग्णांना घरीच विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. अनेक कोरोना रुग्णांना कोणतेही लक्षणे आढळत नाहीत. मात्र, कोरोनाचा विषाणू फुप्फुसाला आतून पोखरत असतो. याला वैद्यकीय भाषेत ‘हॅपी हायपोक्सिया’ म्हणतात. ज्यामुळे ऑक्सिजनची पातळी घसरण्याची शक्यता असते. अशा प्रकारचे रुग्ण शेवटच्या क्षणी रुग्णालयात पोहोचतात. मात्र, उशीर झाल्याने त्यांना वाचवणे कठीण जाते.
‘हॅपी हायपोक्सिया’ प्रकारात ज्या रुग्णांची प्रतिकारशक्ती चांगली व सक्षम आहे ते यावर मात करतात. मात्र, ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे किंवा संसर्गाची तीव्रता वाढली आहे अशा रुग्णांची आठ- दहा दिवसांनंतर अचानक ऑक्सिजनची पातळी घसरते. ज्यामुळे रुग्ण अत्यवस्थ होतो. अशी धोकादायक परिस्थिती टाळण्यासाठी रुग्णांना, नागरिकांना आपल्या रक्तातील ऑक्सिजनची लपलेली कमतरता वेळीत लक्षात येण्यासाठी सहा मिनिटांची चालण्याची चाचणी उपयुक्त ठरत आहे. या चाचणीनंतर ज्यांची ऑक्सिजन पातळी खाली गेल्याचे लक्षात आल्यास रुग्णाला वेळेवर रुग्णालयात दाखल करणे शक्य होईल. सध्या महाराष्ट्रात आयसोलेशन बेड्सही उपलब्ध नाहीत. अशावेळी हॅपी हायपोक्सिया रुग्णांना ऑक्सिजनयुक्त बेड मिळणे कठीण आहे. त्यामुळे अशी परिस्थिती टाळण्यासाठी ‘सिक्स मिनिट वॉक टेस्ट’ चाचणी करण्यास राज्याच्या आरोग्य विभागाने नागिरकांना आवाहन केले आहे.
‘सिक्स मिनिट वॉक’ चाचणी कोणी व कशी करावी?
ताप, सर्दी, खोकला अथवा कोरोनोची लक्षणे जाणवणारी व्यक्ती तसेच होम आयसोलेशनमध्ये असणारे रुग्ण ही चाचणी करू शकतात.
ही चाचणी करण्यापूर्वी बोटात पल्स ऑक्सिमीटर लावून त्यावरील ऑक्सिजनची नोंद करावी. त्यांनतर ऑक्सिमीटर तसेच बोटात ठेवून घरातल्या घरात सहा मिनिटे चालावे (पायर्यांवर चालू नये).
यादरम्यान अतिवेगात किंवा हळूहळू चालू नये तर मध्यम चालावे.
सहा मिनिटे चालून झाल्यानंतर पुन्हा ऑक्सिजनच्या पातळीची नोंद घ्यावी.
सहा मिनिटे चालूनही ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाले नाही तर तर तब्येत उत्तम असे समजावे.
समजा ऑक्सिजन एक ते दोन टक्क्यांनी कमी होत असेल तर काळजी न करता दिवसातून पुन्हा दोन वेळा अशीच चाचणी करावी जेणेकरून काही बदल होतो का ते लक्षात येईल.
ज्यांना बसल्याजागीच धाप, दम लागतो त्यांनी ही चाचणी करु नये, 60 वर्षांहून अधिक वयाच्या व्यक्ती 6 मिनिटांऐवजी 3 मिनिटे चालून ही चाचणी करू शकतात.
चाचणीचा निष्कर्ष कसा समजवायचा?
सामान्य व्यक्तींची ऑक्सिजन पातळी 97 ते 99 चांगली मानली जाते.
सहा मिनिटे चालल्यानंतर ऑक्सिजनची पातळी 93 पेक्षा कमी होत असेल, चालणे सुरू करण्यापूर्वी जी पातळी होती त्यापेक्षा 3 टक्क्यांपेक्षा जास्त घट होत असेल किंवा सहा मिनिटे चालल्यानंतर दम, धाप लागल्यासारखे वाटत असेल तर त्या व्यक्तीला ऑक्सिजन अपुरा पडतो आहे, असे समजून त्याला रुग्णालयात दाखल करावे.