डॉ. प्रशांत मोरलवार
उन्हाळ्यामध्ये आपल्या बाळाची योग्य काळजी घेणे अधिक गरजेचे असते. नव्याने आई-बाबा झालेल्यांना अनेकदा उन्हाळ्यातील काही समस्यांमुळे गोंधळून अथवा घाबरून जायला होते. बाळाच्या काळजीसाठी काही महत्त्वाच्या बाबींचे पालन करावे.
इतर ऋतूंपेक्षा उन्हाळ्यात आपल्या बाळाची काळजी घेणे अधिक आव्हानात्मक असते. डायपर आणि उष्णतेचे पुरळ, डिहायड्रेशन आणि भूक कमी होणे अशा अनेक समस्या लहान मुलांमध्ये दिसून येतात. आपल्या बाळाला अशा समस्यांपासून कसे दूर ठेवता येईल, त्याकरिता काही खास टिप्स खालीलप्रमाणे आहेत.
बाळाला हायड्रेटेड ठेवा : बाळाला हायड्रेटेड राहण्यास मदत करण्यासाठी वेळोवेळी आपल्या बाळाला स्तनपान द्या. घामामुळे शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते. त्यामुळे आपल्या बाळास पुरेसे पाणी देत त्यांना हायड्रेटेड राहण्यास मदत करा.
सुती कपडे वापरा : आपल्या बाळाला सुती कपड्यात गुंडाळून घ्या. फक्त रात्रीच्या वेळीच डायपरचा वापर करा. जाड चादर अथवा ब्लँकेट वापरणे टाळा. कारण, त्यामुळे बाळ गुदमरू शकते. उन्हाळ्यात आपल्या मुलांना उबदार टोपी आणि स्वेटर घालू नका. आपल्या मुलांना उष्माघातापासून दूर ठेवण्यासाठी दुपारच्या वेळी भर उन्हात बाळाला घेऊन बाहेर पडणे टाळा.
शरीराचे योग्य तापमान राखा : आपली मुले शांतपणे झोपू शकतील हे ध्यानात घ्या. पलंगाकरिता सुती चादरच वापरा. सॅटिन किंवा लोकरीचे कपडे टाळा. लहान मुलांच्या खोलीत योग्य तापमान राखा. आपल्या बाळाला कारचे दरवाजे, खिडक्या लावून एकटे सोडून जाऊ नका. कारण, यामुळे जीव गुदमरून बाळाचे प्राणही जाऊ शकतात. आपला परिसर स्वच्छ आणि डासांपासून मुक्त ठेवा.
संतुलित आहार आवश्यक : आपल्या मुलाचे वय 6 महिन्यांपेक्षा जास्त असेल, तर बाळाला पेज, नारळाचे पाणी किंवा अगदी दही देऊ शकता. आपण त्यांना काकडी, बेरी आणि ताज्या भाज्यादेखील देऊ शकतो. बाटलीबंद केलेले फळांचे रस देणे टाळा. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपल्या बाळाला रोग प्रतिकारशक्ती वाढविणारे पदार्थ द्या.
त्वचेवरील पुरळ : आपल्या बाळाला डायपरमुळे पुरळ उठत असतील, तर आपण फक्त बाळाला कोमट पाण्याने स्वच्छ करावे आणि डॉक्टरांनी सुचविलेले क्रिम वापरावे. त्यांना वारंवार डायपर घालू नका.
उष्णतेचे पुरळ : आपल्या मुलांच्या चेहर्यावर, मानेवर, हातावर आणि पायांवर लहान-लहान ठिपके दिसल्यास दुर्लक्ष करू नका. हे उष्णतेच्या पुरळ बाळाला अस्वस्थ करू शकतात. तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे योग्य पीएच असलेला साबण वापरा.
गरम पाण्याने अंघोळ टाळा : अतिशय गरम पाण्याने बाळाला अंघोळ घालणे टाळा. पुरळांची समस्या टाळण्यासाठी आपल्या बाळाला स्वच्छ कपडे घाला.