जळगाव शहर व जिल्ह्यात Covid-19 च्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. कोरोना मृतांवर अंत्यसंस्कारासाठी राखीव ठेवलेल्या नेरीनाका स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी जागा शिल्लक उरलेली नाही. नवीन बांधलेले ६ ओटेदेखील कमी पडत असून जमिनीवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे. तरीही काही मृतदेहांच्या अंत्यसंस्कारासाठी वाट पाहण्याची वेळ नातलगांवर येत आहे. इतकी भयावह परिस्थिती स्मशानभूमीत पाहिल्यावर लक्षात येते. मात्र प्रशासन कागदोपत्र परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगत आहे. नेरीनाका स्मशानभूमी कोरोनाने मृत्यू झालेल्यांवर अंत्यसंस्कारासाठी राखीव आहे. तेथे आठवडाभरात अंत्यसंस्कार झालेल्या मृतदेहांची संख्या व प्रशासनाकडून दररोज जाहीर केल्या जात असलेल्या कोरोना मृतांच्या आकडेवारीत कमालीची तफावत आहे.
Covid-19 जिल्हा शल्य चिकित्सकांना याबाबत विचारणा केली असता सारीचे रुग्ण व इतर रुग्णांचा समावेश असल्याचे सांगून वेळ मारून नेली जात आहे. मात्र इतर कारणाने मृत्यू असेल तर नेरीनाका स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केलेच जाणार नाहीत. त्यामुळे एक तर ते दगावलेले रुग्ण हे कोरोनाचेच आहेत अथवा सारीचे. सारीने जर एवढे मृत्यू होत असतील तर तेदेखील गंभीर आहे. त्यासाठी प्रशासनाने नागरिकांना अंधारात न ठेवता जर वस्तुस्थिती लक्षात आणून दिली तर प्रशासनाला कदाचित नागरिकांचे अधिक सहकार्य लाभेल व कोरोना संदर्भातील नियमावलीचे अधिक काटेकोर पालन करून कोरोना संसर्गाला आळा घालणे शक्य होऊ शकेल. मात्र प्रशासनाकडून तसे होताना दिसत नाही.
कोरोना उद्रेकाचा उच्चांक (पीक) गाठला गेला असून हळूहळू जळगाव शहर व जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत जाईल, असा अंदाज जाणकारांकडून व्यक्त होत आहे. मात्र अद्यापही हजारच्या वरच रुग्ण सापडत असल्याने परिस्थितीतील गांभीर्य कायम आहे. नागरिकांना प्रशासनाकडून विनाकारण घराबाहेर पडणे टाळण्याचे आवाहन वारंवार केले जात आहे. मात्र नागरिक काही परिस्थितीचे गांभीर्य समजून घेण्याच्या मन:स्थितीत नसल्याचेच वारंवार बाजारात होणाऱ्या गर्दीवरून लक्षात येत आहे. अगदी आठवडे बाजारही नियम डावलून भरवले जात असल्याने संसर्ग वाढला तर त्याचा दोष नागरिकांचाच असेल. त्या वेळी परिस्थिती आटोक्याबाहेर जाऊन ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, रेमडेसिविर नाही, याचा दोष प्रशासनावर टाकता येणार नाही, त्यासाठी आपणही तेवढेच जबाबदार राहू, हेदेखील समजून घेतलेले बरे…