मुंबई : महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्येत वेगाने भर पडत आहे. हे पाहता 10 दिवसांनंतर राज्यात 11 ते 12 लाख सक्रिय रुग्ण असतील. त्यामुळे रुग्णांना आरोग्य सेवा पुरविण्याचा भार पेलवणार नाही, असे आरोग्य विभागाने राज्य सरकारला कळविले आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी तातडीने सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांना बोलावले आहे.
राज्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेतल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी 21 दिवसांचा लॉकडाऊन लागू करण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे शनिवारी दुपारी होणार्या बैठकीनंतर ठाकरे सरकार लॉकडाऊनबाबत काय निर्णय घेणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
राज्यात दररोज 50 ते 60 हजारांहून अधिक रुग्ण आढळून येत आहेत. राज्यात मागील 9 दिवसांपासून 4 लाखांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले. सरकारने आरोग्य सेवासुविधा वाढवल्या असल्या तरी रुग्णसंख्या अशीच वाढत राहिल्यास ती सुविधा कमी पडणार असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. डॉक्टर, नर्सेस व इतर प्रशिक्षित मनुष्यबळाची कमतरता भासत आहे. राज्यातील कोरोनाची दुसरी लाट तीव्र असून, अजून किमान महिनाभर तरी ती राहील, अशी भीती केंद्रीय पथकांनी व तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. तर पुढील 10-12 दिवसांनंतर राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या 11 ते 12 लाखांच्या घरात जाईल व त्या परिस्थितीत त्यांना आरोग्य सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यास आपण सक्षम नसू, असे बजावले आहे. त्यामुळे राज्य सरकारला कोरोना साखळी तोडण्यासाठी सध्या तरी तातडीचा उपाय म्हणून पूर्णत: लॉकडाऊन लावण्याशिवाय पर्याय उरलेला नाही, अशी चर्चा आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी आपल्या मंत्रिमंडळातील सहकार्यांशी सद्य:स्थितीबाबत चर्चा केली. यात एमपीएससी परीक्षा, विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षा, सध्या लावण्यात आलेले कठोर निर्बंध, विकेंड लॉकडाऊन आदींसह राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. यात आरोग्यमंत्री राजेश टोपे, आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यासह प्रमुख मंत्री व विरोधी पक्षाचे नेते उपस्थित होते.
21 दिवसांचा लॉकडाऊन हवा
विजय वडेट्टीवार यांनी केवळ विकेंड नव्हे तर 21 दिवसांचा कडक व संपूर्ण लॉकडाऊन लावण्याची गरज असल्याचे सांगितले. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी 15 ते 21 दिवस लागतात. लॉकडाऊनच्या काळात कोरोनाची साखळी तोडणे आणि आवश्यक व पायाभूत सेवा-सुविधा उभारणे शक्य होते, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे.
राज्यातील आरोग्य सेवा- सुविधांची स्थिती
* 81 टक्के आयसोलेशन बेडस् भरले
*17 टक्के कोरोना संशयितांनी बेडस् भरले
* 33 टक्के ऑक्सिजन बेड भरले
*60 टक्के आयसीयू बेडस् भरले
*33 टक्के व्हेंटिलेटर्स भरले
सक्रिय साडेपाच लाख रुग्णांची स्थिती
* 60 टक्के गृह विलगीकरण
* 40 टक्के संस्थात्मक विलगीकरण
* 5 टक्के रुग्ण ऑक्सिजनवर
* 1 टक्के आयसीयू बेडवर
* 1 टक्केपेक्षा कमी रुग्ण व्हेंटिलेटरवर
रेमडेसिवीरचा पुरवठा वीस दिवसांनंतर
एकूण रुग्णांपैकी 10 ते 15 टक्के गंभीर रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शनची गरज भासू शकते. अशा स्थितीत राज्याला दररोज सव्वा ते दीड लाख रेमडेसिवीर इंजेक्शनची गरज लागणार आहे. मात्र, किमान पुढील 20 दिवस रेमडेसिवीरचे अपेक्षित उत्पादन करणे अशक्य असल्याचे सांगत या कंपन्यांनी हात वर केले आहेत. त्यामुळे राज्य सरकारसमोर रेमडेसिवीर औषध उपलब्ध करून देण्याचे गंभीर आव्हान असेल.
कोरोना चाचणीसाठी लागणार्या सामग्रीचाही तुटवडा
राज्यातील साडेपाचशेहून अधिक प्रयोगशाळा, दररोज दोन ते सव्वादोन लाख कोरोना चाचणी करत आहेत. ‘ब्रेक दि चेन’ अंतर्गत भाजीपाला, किराणा दुकानदार, डिलिव्हरी बॉय, खासगी कार्यालयातील कर्मचार्यांना दर 15 दिवसाला आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक केली आहे. त्यामुळे कोरोना चाचण्या करणार्या नागरिकांची भर पडली आहे. त्यामुळे चाचणीसाठी लागणार्या सामग्रीचा तुटवडा भासत आहे.
ऑक्सिजनची कमतरता
राज्यात दररोज 1 हजार 200 मेट्रिक टन ऑक्सिजनचे उत्पादन होत आहे तर मागणी 800 मेट्रिक टन आहे. 10 दिवसांनंतर 1 हजार 700 ते 1 हजार 800 मेट्रिक टन इतक्या ऑक्सिजनची मागणी असेल. राज्य सरकारने इतर राज्यांतून महाराष्ट्राला लिक्विड मेडिकल ऑक्सिजनचा पुरवठा करण्याची मागणी यापूर्वीच केली आहे.