बंगालच्या उपसागरात यंदा एक महिना आधीच, 7 एप्रिल रोजी मान्सूनपूर्व पावसाचे वातावरण तयार झाले आहे. यंदा मार्चपासूनच देशात सर्वत्र कमाल तापमान वाढले होते. यंदाचा मार्च महिना आजवरचा सर्वात उष्ण ठरला. त्याचाच सकारात्मक परिणाम यंदाच्या मान्सूनवर दिसत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
यंदा उन्हाळा अतिशय कडक असल्याने मान्सून चांगला बरसेल आणि वेळेआधी दाखल होण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरासह अंदमान – निकोबार बेटांतही चक्रीय स्थिती तयार झाली. वारे 30 ते 40 कि.मी. वेगाने वाहत आहे. तसेच महाराष्ट्रात मराठवाडा ते कर्नाटक असा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे; तर जम्मू काश्मीरमध्ये पश्चिमी चक्रवात सक्रिय झाल्याने तेथे बर्फवृष्टी तर उर्वरित 32 राज्यांत हलका ते मध्यम पाऊस 7 ते 10 एप्रिल दरम्यान होईल, असा अंदाज मंगळवारी हवामान शास्त्र विभागाने व्यक्त केला आहे. दिल्लीमध्ये या तीन दिवसांत मोठ्या वादळाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
तज्ज्ञांच्या मते यंदा उन्हाळा लवकर सुरू झाला. मार्च महिन्यातच बहुतांश शहरांचे तापमान 35 ते 38 अंशांवर गेले. यंदाचा मार्च गेल्या अनेक वर्षांत तिसर्यांदा सर्वाधिक उष्णतेचा ठरला. तर एप्रिल महिन्यात पार्याने चाळीशी गाठली. वातावरण तापत असताना यंदा पाऊस झाला नाही. त्यामुळे सलग 38 दिवस प्रचंड उन्हाचे चटके बसत आहेत. या सर्व वातावरणाचा परिणाम म्हणून बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने अंदमान-निकोबार बेटांवर पाऊस सुरू झाला. तसेच जम्मू-काश्मीरमध्ये पश्चिमी चक्रवात सक्रिय झाल्याने हिमालयात बर्फवृष्टी सुरू झाली आहे. त्या शीतलहरी उत्तर भारतात पसरून काही भागात तापमान 2 ते 4 अंशांनी कमी होण्याची शक्यता आहे.
मे मध्ये जोरदार पावसाची शक्यता
हवामान तज्ज्ञांच्या मते, यंदा मान्सून लवकर म्हणजे 2 जूनच्या आसपास दाखल होईल. मात्र, मान्सूनपूर्व पाऊस धो-धो पडणार आहे. तो एप्रिलच्या मध्यावर व मे महिन्याच्या दुसर्याच आठवड्यात होऊ शकतो.