हिवरखेड(धिरज बजाज)- हिवरखेड शहरात निकृष्ट रस्त्यांची भरमार झाली असून निधी कोणताही असो रस्ता उत्कृष्ट ऐवजी निकृष्ट दर्जाचाच होतो. निकृष्ट दर्जाची पुरेपूर गॅरंटी असल्याने या निकृष्ट रस्त्यांचे उच्चस्तरीय पोस्टमार्टम करा हो सायेब अशी मागणी जनतेकडून होत आहे.
मागील काही वर्षांमध्ये हिवरखेड ग्रामपंचायतला शासनाचा मोठ्या प्रमाणात थेट निधी मिळाला, सोबतच जिल्हा परिषद, आमदार निधी, इत्यादी अनेक प्रकारच्या निधीमधून विविध विकास कामे झाली ज्यामध्ये गावातील अंतर्गत रस्त्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. फक्त मेन रोड वरील काँक्रीट रोड, आमदार निधीतील पेव्हर ब्लॉक आणि काही मोजके इतर चांगले अपवाद वगळले तर जवळपास सर्वच रस्ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे झालेले आहेत. ज्यामध्ये बहुतांश रस्त्यांच्या कामात इस्टिमेट प्रमाणे काम करण्यात आलेले नाही. अनेक रस्त्यामधील लोखंडाच्या बारीक-बारीक छड्या बाहेर पडून अपघातास निमंत्रण देत आहेत. काँक्रीट रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. पेवर ब्लॉक चे काम सुरू होताच दबले आहे. मंजूराती पेक्षा सिमेंट काँक्रीटचे थर कमी घेण्यात आलेले आहेत. सिमेंटचा वापर अत्यंत कमी प्रमाणात करण्यात आल्याने, आणि माती मिश्रित रेती वापरल्याने, रस्त्यांवर मोठमोठे खड्डे, लाबांच लांब भेगा, मोठमोठे तडे गेले आहेत. मोजमाप मध्ये जाडीचा फरक पकडीत येऊ नये म्हणून साईड मध्ये पूर्ण उंची घेण्यात येते तर मधात मुरूमची भरती टाकून त्याच्यावर अत्यंत कमी काँक्रीट टाकण्यात आलेले आहे. काँक्रीट रस्त्यांच्या साईड फिलिंग पूर्णपणे भरण्यात आलेल्या नाहीत. ग्रामस्थांना स्वतःच्या दुकानांसमोर स्वखर्चाने भरती टाकावी लागल्याचे दिसत आहे. काही रस्त्यांमध्ये तर 1 ग्राम सुद्धा लोखंड वापरण्यात आलेले नाही. आवश्यक तेव्हडे खोदकाम केले जात नाही. बहुतांश जागी रोलर ने दबाई केली जात नाही. मोठ्या बोल्डरचे थर कमी घेतले जातात. असे अनेक रस्त्यात अनेक प्रकारच्या अनियमितता झालेल्या असून यामध्ये अनेकांना “लक्ष्मी दर्शन” झाल्याशिवाय दिवसा ढवळ्या असे निकृष्ट काम करण्याची हिंमत कंत्राटदार करू शकत नाही असे बोलले जात आहे.
निकृष्ट रस्त्यामधील अनेक रस्त्यांचा तर गॅरंटी पिरेड सुद्धा संपलेला नसल्याचे बोलले जाते.
शहरात प्रवेशाचा मुख्य मार्ग काली पिली स्टँड ते महात्मा गांधी विद्यालय पर्यंतचे विविध टप्प्यातील कामे, चक्क ग्रामपंचायत समोरील मार्ग आणि चौदाव्या वित्त आयोगातील गावातील जवळपास सर्वच रस्ते ही निकृष्ट दर्जाची काही खास उदाहरणे आहेत. एकंदरीत सर्व प्रकार पाहिले की वेळोवेळी बदलणारे विविध पदांवरील स्थानिक लोकपतिनिधी, संबंधित विविध अधिकारी आणि अभियंते यातील बहुतांश यंत्रणेचे या निकृष्ट कामांकडे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचे स्पष्ट दिसत आहे.
निकृष्ट कामामुळे उपस्थित झालेले प्रश्न
- पूर्ण काम इस्टिमेट नुसार न करताही एम. बी. सी. सी. आणि ग्रामपंचायत एनओसी कशी काय प्रदान केल्या जाते
- कोणतेही निकृष्ट रस्त्याची गॅरंटी पिरियडमध्ये दुरुस्ती का करवून घेतल्या जात नाही?
- निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत का टाकले जात नाही?
- इस्टिमेट प्रमाणे पूर्ण काम केले जात नसतानाही ठेकेदाराची पूर्ण देयके कशी अदा केली जातात?
- स्थानिक लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी, अभियंते हे डोळे बंद करून दिवसाढवळ्या असे निकृष्ट काम कसे काय होऊ देतात?
- कामे न करताच बिले काढणाऱ्या त्या ठेकेदारावर अजून कारवाई का केली नाही?
उच्चस्तरीय पोस्टमार्टम आवश्यक
मा. कर्तव्यदक्ष पालकमंत्री, मा. जिल्हाधिकारी तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. इत्यादी वरिष्ठांनी एखाद्या तज्ञ समितीमार्फत हिवरखेड शहरात मागील पाच, दहा वर्षात झालेल्या सर्वच प्रकारच्या रस्त्यांची सखोल चौकशी करून उच्चस्तरीय पोस्टमार्टम करणे आवश्यक असून हे सर्व रस्ते इस्टिमेट नुसार संबंधितांकडून दर्जेदार दुरुस्ती करवून घ्यावी. सोबतच निकृष्ट रस्त्यांसाठी दोषीं असणार्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी सामान्य जनतेतून होत आहे. भविष्यात शहरात होणारे सर्व रस्ते दर्जेदार व्हावेत यासाठी सुद्धा उपाययोजना होणे अपेक्षित आहे.